सायबर गुन्हेगारांचा नागपुरातील दोघांना गंडा : रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:15 AM2020-02-16T00:15:42+5:302020-02-16T00:16:21+5:30
सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील एका वृद्धासह दोघांना थाप मारून त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. अजनी आणि नंदनवन पोलीस ठाण्यात या संबंधाने वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील एका वृद्धासह दोघांना थाप मारून त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. अजनी आणि नंदनवन पोलीस ठाण्यात या संबंधाने वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
अजनीच्या हनुमाननगरात राहणारे राजेशकुमार गुरुदासराम ओवानहरी (वय ६५) हे २४ जानेवारीला सकाळी त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर ८१०१४३२३८८ क्रमांकावरून फोन आला. पेटीएममधून बोलतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने केवायसी पूर्ण करण्यासाठी सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे ५ रुपये जमा करा, असेही म्हटले. केवळ पाच रुपये जमा करायचे आहेत, असे समजून ओवानहरी यांनी आरोपीने पाठविलेले अॅप डाउनलोड करून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ५ रुपये जमा केले. काही वेळेतच त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात ओवानहरी यांच्या खात्यातून १ लाख, ८८ हजार, ५०० रुपये काढून घेण्यात आल्याचे नमूद होते. आरोपीने चारवेळा व्यवहार (ट्रान्जॅक्शन) करून रक्कम काढली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ओवानहरी यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदवली. तेथून तपास झाल्यानंतर अजनी पोलिसांकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. अजनी पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
परस्पर रक्कम काढून घेतली
रितूराज दामोधर मोरे (वय ४८, रा. निर्मलनगरी, नंदनवन) यांच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२० च्या दरम्यान ६१ हजार रुपये परस्पर काढून घेतले. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर मोरे यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.