नागपुरात सुरू होणार सायबर पोलिस ठाणे; पोलिस निरीक्षकांसह ७४ अधिकारी कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 11:09 PM2020-08-06T23:09:06+5:302020-08-06T23:09:23+5:30
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. रोज नवनव्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गुन्हे शाखेत सायबर सेल आहे.
नागपूर : नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलिस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. रोज नवनव्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गुन्हे शाखेत सायबर सेल आहे. मात्र सायबर सेलला स्वतंत्र अधिकार आणि मनुष्यबळ नसल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यात अडसर निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन नागपुरात सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे, अशी मागणी वजा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालनालयाकडे पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून मनुष्यबळही निश्चित झाले आहे. त्यानुसार नागपूरच्या सायबर पोलिस ठाण्यासाठी ४ पोलिस निरीक्षक, ९ सहायक निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ३ सहाय्यक उपनिरीक्षक, १२ हवलदार १५ नायक, २६ पोलीस शिपाई आणि २ वाहन चालक अशी एकूण ७४ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
गुन्हे शाखेतून होणार नियंत्रित
गुन्हे शाखेतील एक सहाय्यक पोलीस आयुक्त या सायबर पोलिस ठाण्याला नियंत्रित करणार आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त परिमंडळ अधिकारी म्हणून आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग प्रमुख म्हणून या पोलिस ठाण्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार आहेत. शहरातील ३२ ही पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र या सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारात राहणार आहे.
गुन्हे शाखेत सुरू होणार
सध्या गुन्हे शाखेच्या इमारतीत सायबर शाखेचा कारभार सुरू आहे. तेथे अत्याधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. केवळ पोलिस ठाण्याचा फलक तेवढा लावणे बाकी आहे. हा फलक लावण्यासोबतच येथील ठाणेदार म्हणून येत्या चार ते पाच दिवसात पोलीस आयुक्त संबंधित अधिकार्यांची नियुक्ती करणार आहेत. पुढच्या आठवड्यात सायबर ठाण्याचा कारभार सुरू होईल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.