सायबर सुरक्षेसाठी वर्षात ४ कोटींचा खर्च : कॉसमॉस बँक सायबर दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:12 PM2019-08-12T12:12:50+5:302019-08-12T12:14:43+5:30
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे एटीएम स्वीचवर हॅकरनी ११ व १३ ऑगस्ट रोजी हल्ला करुन ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारला होता़.
पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे उभारुन त्याद्वारे जगभरातील २९ देशातून तसेच भारतातील विविध शहरांमधून क्लोन केलेल्या व्हिसा व रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून दरोडा घालण्यात आला होता़. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले़. या वर्षभरात सायबर सुरक्षा विषयक विविध ५ एजन्सीजनी दिलेल्या सूचनेंनुसार ४ कोटी रुपये खर्च करुन बँकेने अद्ययावत सुरक्षा यंत्रणा निर्माण केली आहे़. हॅकरने हल्ला केल्यास त्याचा त्वरीत अलर्ट मिळेल, अशी यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले़.
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे एटीएम स्वीचवर हॅकरनी ११ व १३ ऑगस्ट रोजी हल्ला करुन ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारला होता़. हे पैसे ४१ शहरातील ७१ बँकांच्या विविध एटीएममधून काढले गेले होते़. त्यात भारतात रुपे कार्डच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये काढले गेले़. त्यातील सर्वाधिक ८९ लाख रुपये कोल्हापूर शहरातील विविध एटीएममधून काढले होते़.याप्रकरणी पुणेपोलिसांनी स्वतंत्र सायबर पथक स्थापन करुन कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत करुन तेथील एटीएममधून पैसे काढणाºयांना सर्वप्रथम अटक करण्यात यश मिळविले़. आतापर्यंत अशा १३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे़. याबाबत तपास अधिकारी पोलीस जयराम पायगुडे यांनी सांगितले की, याप्रकरणी २९ देशातील पोलिसांना इंटरपोलमार्फत सर्व माहिती देण्यात आली आहे़. केंद्र सरकारमार्फत सर्व देशांमध्ये पत्रव्यवहार व सर्व कागदपत्रे पाठविण्यात आली आहे़. त्यांच्याकडून योग्य प्रतिसादाची अपेक्षा आहे़ जगभरातील वेगवेगळ्या २९ देशातील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे़.या हँकरांचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे़. मात्र, ही सर्व प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्याने त्यामागील मुख्य सुत्रधाराचा अद्याप छडा लागू शकला नाही़.
कॉसमॉस बँकेतून १३ ऑगस्टला हॉगकॉगमधील हँगसेंग बँकेमध्ये ए एल़ एम ट्रेडिंग या खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते़. सायबर क्राईम सेलने तातडीने हालचाल करुन ही रक्कम गोठविण्यास बँकेला सांगितली होती़. त्याप्रमाणे ही रक्कम गोठविण्यात आली आहे़.
........
गोठविलेली रक्कम तीन महिन्यात मिळण्याची अपेक्षा
याबाबत बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले की, हँगसेंग बँकेत गोठविण्यात आलेली रक्कम मिळण्यासाठी बँकेने हॉगकाँगच्या न्यायालयात अपिल करुन ही रक्कम हस्तांतरीत करण्यास स्थगिती मिळविली आहे़. ही रक्कम मिळविण्यासाठी आर्थिक सल्लागाराची नेमणूक केली आहे़ .सध्या हॉगकॉगमधील वातावरण अस्थिर असल्याने त्याचा परिणाम पोलिसांकडून मिळणाºया प्रतिसादावर झाला आहे़. तरीही येत्या ३ महिन्यात ही रक्कम बँकेला परत मिळू शकेल, असे वाटत आहे़.