सायबर चोरांचा महिलेला दोन लाखांचा गंडा, पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 08:31 AM2022-10-25T08:31:58+5:302022-10-25T08:32:23+5:30
कफपरेड परिसरात राहण्यास असलेली तरुणी कंपनीत नोकरी करते. फर्निचर आणि घरगुती वापराचे सामान कमी किमतीत तत्काळ विकण्याबाबतची जाहिरात तिला १७ ऑक्टोबरला फेसबुकवर दिसली.
मुंबई : नौदल अधिकारी असल्याचे भासवत सायबर चोरांनी कफ परेडमधील एका महिलेला वॉशिंग मशीन आणि एसी विकण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे.
कफपरेड परिसरात राहण्यास असलेली तरुणी कंपनीत नोकरी करते. फर्निचर आणि घरगुती वापराचे सामान कमी किमतीत तत्काळ विकण्याबाबतची जाहिरात तिला १७ ऑक्टोबरला फेसबुकवर दिसली. तरुणीने तत्काळ जाहिरातीखाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने भारतीय नौदलात नोकरीस असून मुंबईबाहेर बदली झाल्याने एसी आणि वॉशिंग मशीन १५ हजार रुपयांना विकायचे असल्याचे सांगितले. तरुणीने खरेदीची तयारी दर्शविताच संबंधिताने तिच्या व्हॉट्सअॅपवर स्कॅनर पाठविला.
तरुणीने गुगल पेच्या माध्यमातून आगाऊ रक्कम म्हणून दोन हजार रुपये पाठविले. हे स्कॅनर ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीचे होते, तर नारायण नाव सांगणाऱ्या त्या नौदल अधिकाऱ्याने संजय रावत याला उरलेले पैसे पाठवण्यास सांगितले. तरुणीने तसे केले. मात्र, पाठविलेल्या रकमेचा सिक्वेन्स चुकत असल्याचे सांगून आणखीन पैसे उकळण्यात आले. त्यात तरुणीच्या खात्यातील २ लाख रुपये लंपास झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने कफपरेड पोलिसांत तक्रार नोंदवली.