Cybercrime: सावधान! सायबर गुन्हेगारी पाच टक्क्यांनी वाढली, केवळ एक तृतीयांश प्रकरणात तपास पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:22 AM2022-09-01T07:22:07+5:302022-09-01T07:22:27+5:30
Cybercrime:
नवी दिल्ली : देशात २०२१मध्ये सायबर गुन्ह्याची ५२,९७४ प्रकरणे दाखल झाली आहेत. २०२०च्या (५०,०३५ प्रकरणे) तुलनेत ती पाच टक्के अधिक आहेत. तर, २०१९च्या (४४,७३५ प्रकरणे) तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक आहेत. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या भारतातील गुन्हे २०२१ अहवालानुसार सायबर गुन्ह्यातील ७०%पेक्षा अधिक प्रकरणे तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आसाममधील आहेत.
सायबर दहशतवादाची १५ प्रकरणे
देशात २०२१मध्ये सायबर दहशतवादाची एकूण १५ प्रकरणे दाखल करण्यात आली. यातील झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन आणि कर्नाटक, केरळ, मेघालय, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांचा दर तेलंगणात सर्वाधिक २७ होता. त्यानंतर आसाम १३.८, कर्नाटक १२.१, उत्तराखंड ६.३, महाराष्ट्र ४.५ यांचा क्रमांक आहे. दिल्लीत अशा गुन्ह्यांचा दर १.७ होता.
गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीने सांगितले की, २०२१मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची संख्या ही प्रति एक लाख लोकसंख्येवर सरासरी ३.९ अशी नोंदली गेली आहे.