सायबर गुन्हेगारांनी दोघांना १ कोटीला गंडवले, ट्रेडिंगसह अटकेच्या भीतीने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:47 PM2024-10-16T14:47:55+5:302024-10-16T14:48:04+5:30
नेरूळ परिसरात राहणाऱ्या डॉक्टरला ट्रेडिंगबद्दल ऑनलाईन माहिती मिळाली होती. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी ६८ लाख रुपये भरले होते.
नवी मुंबई : सायबर गुन्हेगारांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा जणांची ऑनलाईन तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केली. एका व्यक्तीची ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक केली असून, दुसऱ्या व्यक्तीला कारवाईची भीती दाखवून लुटले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरूळ परिसरात राहणाऱ्या डॉक्टरला ट्रेडिंगबद्दल ऑनलाईन माहिती मिळाली होती. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी ६८ लाख रुपये भरले होते. मात्र, दिलेली मुदत उलटल्यानंतर त्यांनी नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती मिळाली नाही. यावरून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अटकेची धमकी
कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्याची धमकी दिली होती. त्यांचा लाँड्रिंग गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये अटक टाळायची असल्यास पैशाची मागणी करून ५० लाख रुपये उकळले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दोन्ही गुन्ह्यांबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.