Cyrus Mistry Car Accident Update: सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मोठी अपडेट; अनाहिता पंडोलेंनी सीटबेल्ट चुकीचा लावलेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:04 PM2022-12-16T13:04:51+5:302022-12-16T13:05:06+5:30
पालघर पोलिसांनी पंडोले यांच्याविरोधात कथितरित्या निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
टाटा सन्सने माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने अवघ्या उद्योगविश्वाला धक्का बसला होता. मिस्त्री यांची कार चालविणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोले यांनी एक गंभीर चूक केल्याचे समोर आले आहे. पंडोले यांनी योग्य प्रकारे सीटबेल्ट घातला नव्हता. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये हा दावा केल्याचे बोलले जात आहे.
सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा चार सप्टेंबरला मुंबई- अहमदाबाद महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. अनाहिता पंडोले मिस्त्रींची मर्सिडीज कार चालवित होत्या. त्यांच्यावर अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार पंडोले यांनी अपघाताच्यावेळी कार चालवित असताना योग्य प्रकारे सीट बेल्ट लावला नव्हता. पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, कार चालविणाऱ्या अनिहाता पंडोले यांनी सीट बेल्ट कंबरेपासून लावला नव्हता. तर त्यांनी सीटबेल्ट मागच्याबाजुने ओढून फक्त हार्नेस ओढला होता. तसेच लॅप बेल्टला अॅडजस्ट केला नव्हता.
पालघर पोलिसांनी पंडोले यांच्याविरोधात कथितरित्या निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन कायद्याव्यतिरिक्त, भारतीय दंड संहितेच्या कलम 304(अ) (निष्काळजीपणाने मृत्यू ओढवून घेणे), 279 (रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि 337 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणे) आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कासा पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.
अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. डेरियस हे आता बरे झाले असून त्यांनी अपघातावेळी नेमके काय घडले याची माहिती पोलिसांना दिली होती. डेरियस यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉ अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट आहेत. त्याच कार चालवत होत्या. अपघातानंतर दोघांनाही मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.