'दबंग' डीसीपीच्या बायकोचीच पर्स चोरीला गेली...गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:59 PM2019-09-03T17:59:17+5:302019-09-03T18:34:17+5:30
याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - सीएसएमटी परिसरात असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथे दबंग पोलीस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली आहे. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकाच खळबळ उडाली होती. ही घटना शनिवारी घडली असून याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही आणि अन्य बाबींद्वारे तपास करत असल्याचं एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली आहे.
सध्या अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस उपायुक्त असलेले शिवदीप लांडे यांनी पाटणाचे पोलीस अधिकारी असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि त्यांची दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख होती. त्यांची पत्नी डॉ. ममता शिवतारे - लांडे यांची गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत पर्स चोरली आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील बादशाह ज्यूस सेंटरनजीक असलेल्या शेख मेनन लेनमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी भांडण करण्याचे नाटक करून ममता यांची पर्स लांबवली आहे. ममता या स्त्रीरोगतज्ञ असून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये डॉ. ममता यांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, २ हजार रुपये होते.