दाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 05:34 PM2018-08-21T17:34:00+5:302018-08-21T17:35:17+5:30
औरंगाबादेतून रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरले या तिघांना ताब्यात घेतले, तपास यंत्रणांच्या छाप्यात कट्यार, तलवार आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाने कालपासून रात्रभर कारवाई केली. कारवाईअंती औरंगाबादमध्ये पहाटेच्या सुमारास तपास यंत्रणांनी आरोपी सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी छापा टाकला. या छाप्यात पिस्तूल सापडले असून या पिस्तूलनेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा दाढ संशय तपास यंत्रणांना आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणी आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. रोहित रेगे, नचिकेत इंगळे आणि अजिंक्य सुरले अशी या तिघांची नावे आहेत. तपास यंत्रणांच्या छाप्यात कट्यार, तलवार आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नालासोपारा येथे स्फोटके सापडल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सीबीआय आणि एटीएसने शनिवारी सचिन अंदुरेला अटक केली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास औरंगाबादमध्ये केलेल्या कारवाईत सापडलेले पिस्तूल हे डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. हे पिस्तूल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय याप्रकरणात कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध आहे का याचाही तपास होणार आहे.