Dabholkar Murder Case: परदेशी पाणबुड्यांनी शोधले अरबी समुद्रातले पिस्तूल; येणार ७.५ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:59 PM2020-03-05T16:59:47+5:302020-03-05T17:04:43+5:30
Dabholkar Murder Case : या हत्येत वापरलेली एक पिस्तूल सीबीआयने जप्त केली आहे.
मुंबई - ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या केली होती. या हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) महत्वपूर्ण पुरावा सापडला आहे. या हत्येत वापरलेली एक पिस्तूल सीबीआयने जप्त केली आहे. अरबी समुद्रातून नॉर्वेच्या पाणबुड्या, जलतरणपटू आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे पिस्तूल शोधण्यात आलं असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.
दाभोलकरांच्या हत्येमध्ये खरंच हे वापरलं गेलं होतं का हे तपासण्यासाठी पिस्तूल फॉरेन्सिकला पाठविण्यात आले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये सीबीआयने पुणे कोर्टाला माहिती दिली होती की, शस्त्राचा शोध घेण्यासाठी ठाण्याजवळील खारेगाव खाडीजवळील समुद्रात शोध घेणं आवश्यक आहे. कान, नाक आणि घसा (ईएनटी) सर्जन वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना दाभोलकर हत्येचा प्रमुख आरोपी म्हणून सीबीआयने अटक केली. मॉर्निंग वॉकला गेलेले असताना दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
सीबीआयने या दुबईतील एनव्हिटेक मरीन कन्सल्टंट्सने शस्त्र शोधण्यासाठी आपली यंत्रणा नॉर्वेहून मागवली होती. ‘टोपोग्राफिकल अँड लेव्हल सर्व्हे’ नावाच्या एका सर्वेक्षण अहवालात भाग म्हणून खारेगाव खाडीजवळील परिसर शोधण्यासाठी तज्ज्ञांनी लोहचुंबकाचा वापर केला, त्यामध्ये समुद्र तळाशी आणि गाळ खोलीच्या पातळीची तपासणी केली, अशी सूत्रांनी माहिती दिली. या सर्वेक्षणातील भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजर, अँगल मेजरमेंट आणि लेव्हल मेजरमेंटसारख्या अनेक पद्धती वापरल्या गेल्या, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरांकडूनच
राज्य सरकारकडून परवानगी मिळण्यापासून ते पर्यावरणीय परवानगीपर्यंत सीबीआय यंत्रणा संपूर्ण कारवाईत व्यस्त होती. अगदी नॉर्वेहून यंत्रसामुग्री आणण्यासाठी सुमारे ९५ लाख डॉलर्सची कस्टम ड्युटीही माफ करण्यात आली. या तपासासाठी ७.५ कोटी खर्च अपेक्षित आहे. पुण्यातील दाभोलकर आणि कर्नाटकमधील गौरी लंकेश आणि कलबुर्गी या हत्या प्रकरणांचा संबंध असल्याने सीबीआय आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथके (एटीएस) संयुक्तपणे तपासाचा खर्च वाटून घेण्याची शक्यता आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की एप्रिलपर्यंत किंवा पुढील 10 दिवसांत याप्रकरणी खटला सुरू होईल अशी अपेक्षा आहे. हा तपास कधी झाला याबाबत मला माहित नाही. विशेष म्हणजे हा शोध एक वर्षापासून सुरु होता. याबाबत किंचितही माहिती नव्हती. मात्र, कोर्टात पुढे सुनावणीदरम्यान सीबीआयच्या या तपासाबाबत कळेल.