वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:15 PM2019-05-21T16:15:00+5:302019-05-21T16:16:31+5:30
अटकेतील पाच आरोपींना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
ठाणे - ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वज्रेश्वरी मंदिरात दरोडा टाकणाऱ्या ५ आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनीअटक केली. तसेच फरार तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. १० मे रोजी दानपेटी फोडून दरोडेखोरांनी ७ लाख १० हजार रुपयांवर डल्ला मारला होता. त्यापैकी २ लाख ८३ हजार रुपये आणि दोन मोटार सायकल, असा एकूण ३ लाख ८३ हजराचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, अटकेतील पाच आरोपींना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
या घटनेचे गांभीर्य बघून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ विशेष पथकाची नेमणूक केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. गुन्ह्याच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी गोविंद सोमा गिंभल (३५) राहणार गाव दाभलोन तालुका जव्हार , जिल्हा पालघर, विनित सुरजी चिमडा (१९) राहणार गाव गरेल पाडा, पोस्ट अघई तालुका शहापूर जिल्हा ठाणे, भारत लक्ष्मण वाघ (२२) राहणार गावी भुईशेत पोस्ट अघई तालुका शहापूर जिल्हा ठाणे, जगदीश काशिनाथ नावतरे (२६) राहणार गाव गरेल पाडा पोस्ट अघई तालुका शहापूर जिल्हा ठाणे, प्रविण काशिनाथ नावतरे (२२) राहणार गाव गरेल पाडा पोस्ट अघई तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांना दादरा नगर हवेली जव्हार आणि शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले.