बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानावर दरोडा ; कोथरूडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 20:02 IST2019-11-24T19:56:24+5:302019-11-24T20:02:37+5:30
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानावर दरोडा ; कोथरूडमधील घटना
पुणे - कोथरुडमधील पौड रोडवरील आनंदनगर येथील पेठे ज्वेलर्स या सराफी दुकानात दोघा चोरट्यांनी भरदिवसा गोळीबार करुन सव्वा कोटी रुपयांचे दागिने चोरुन नेले़ ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली़ दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
पौड रोडवर आनंदनगर येथे तळमजल्यावर पेठे ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान आहे़ दुपारी दुकानात ३ सेल्समन आणि एक कॅशियर असे चारजण उपस्थित होते़ ग्राहक दुकानात नव्हते. दुपारी चार वाजून ८ मिनिटांनी दोघे जण दुकानात शिरले. त्यांच्या पैकी पहिल्या चोरट्याने दुकानात शिरताच कमरेला लावलेले पिस्तुल काढून एक गोळी हवेत झाडली़ त्याच्या पाठोपाठ दुसरा चोरटा आत आला होता़ त्याने आपल्या पाठीवरील सॅक काढले़ पहिल्या चोरट्याने दुकानातील कामगारांवर पिस्तुल रोखून धरत त्यांना हातवर करायला सांगितले़ त्यानंतर शोकेसमधील दागिन्यांचे बॉक्स काढून देण्यास सांगितले़ त्याच्या सांगण्याप्रमाणे कामगारांनी शोकेसमधील दागिन्याचे बॉक्सेस काढून काऊंटरवर ठेवण्यास सुरुवात केली़ दुसरा चोरटा हे सर्व दागिने सॅकमध्ये भरत होता़ त्याने बॉक्समधील सर्व दागिने सॅकमध्ये भरुन घेतले. यादरम्यान कामगारांनी प्रतिकार करु नये, म्हणून त्याने आणखी एक गोळी हवेत फायर केली़. काही मिनिटात त्यांनी दुकानातील सर्व मोठे दागिने सॅकमध्ये भरुन ते पळून गेले. दोघेही चोरटे चांदणी चौकाच्या दिशेने पळून गेले.
या प्रकरणी पराग पेठे यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ साधारण सव्वा कोटी रुपयांचे दागिने त्यांनी चोरुन नेल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन गुन्हेगारांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.