रेकीखोर दरोडेखोरांना बेड्या, दिवसा फुगे विकायचे अन् रात्री चोरी करायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 08:14 PM2019-07-24T20:14:35+5:302019-07-24T20:17:17+5:30

दिवसा फुगे, वस्तू विकण्याच्या बहाण्याने रेकी करून रात्री दरोडा टाकणारी टोळी जेरबंद 

Dacoity robbers arrested, in a day time they were selling ballons and at night dacoity | रेकीखोर दरोडेखोरांना बेड्या, दिवसा फुगे विकायचे अन् रात्री चोरी करायचे

रेकीखोर दरोडेखोरांना बेड्या, दिवसा फुगे विकायचे अन् रात्री चोरी करायचे

googlenewsNext
ठळक मुद्देदरोडा टाकल्यावर मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांचा वापर करुन पसार व्हायचे. आरोपींनी परिसरातील इतर दोन बंगल्यांमध्ये चोरी केली. 

ठाणे - दिवसा फुगे आणि अन्य वस्तूंची विक्री करण्याचा बहाणा करत परिसराची रेकी करुन रात्री सशत्र  दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. 

शहापूर तालुक्यातील शेलवली गावात १९ जुलै २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास एका बंगल्याच्या बेडरूमचे लोखंडी ग्रील तोडून अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. बंगल्यामध्ये राहणारे सुरेश नुजाजे यांचे हात-पाय बांधून सोबत आणलेल्या हत्याराने त्यांना मारहाण करून त्यांचा खून केला. त्या नंतर बंगल्यामध्ये असलेली रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने घेऊन चोरी केली. या घटनेबाबत शहापूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम अन्वये कलम 302 , 460  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन गुन्ह्याची तात्काळ उकल करण्यासाठी कोकण परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली  ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड व अपर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांनी शहापूर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या बातमीच्या आधारे भिवंडी मधील अंबाडी नाक्याजवळील नवजीवन हॉस्पिटल पाठीमागे असलेल्या एका पडीक इमारतीमधून चमन मदन चव्हाण (वय पंचवीस वर्ष राहणार नयाखेडा ठाणा बबीना जिल्हा झांसी राज्य उत्तर प्रदेश), अनिल हरिभाऊ साळुंखे उर्फ महाजन (वय 32 वर्ष राहणार निघोज निमगाव झोपडपट्टी जिल्हा अहमदनगर), संतोष मोहम बत्ते साळुंके उर्फ डोली (वय 35 वर्ष राहणार गट क्रमांक 3 इंग्लिश मीडियम स्कूलच्या जवळ करमाड जिल्हा जालना), रोहित रमेश पिंपळे (वय 19 वर्ष राहणार वांगी खिर्डी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर), बाबुभाई मदन चव्हाण (वय 18 वर्ष राहणार नयाखेडा पोलीस ठाणे बबीना जिल्हा झांसी राज्य उत्तर प्रदेश), रोशन हरिराम खरे (वय तीस वर्ष राहणार झांसी राज्य उत्तर प्रदेश) यांना २२ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कसून चौकशी दरम्यान त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आणि पाहिजे असलेले आरोपी मराठीसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत.  दिवसा फुगे किंवा अन्य वस्तूंची विक्री करुन ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्याची रेकी करायचे.  दरोडा टाकल्यावर मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांचा वापर करुन पसार व्हायचे. 
१९ जुलै 2019 रोजी आरोपी महिंद्रा बोलेरो कार व मोटरसायकल ने रेकी केलेल्या शहापूर तालुक्यातील शेलवली खंडोबाची गावातील मंगळाजवळ आले. त्यानंतर त्यांनी बंगल्याच्या बेडरूमची लोखंडी ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश केला.  बंगल्यामध्ये उपस्थित सुरेश नुजाजे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी कपड्याने त्यांचे हात पाय बांधले आणि सोबत आणलेल्या फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करून गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर घरामध्ये असलेल्या सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून पळून गेले. जाताना आरोपींनी परिसरातील इतर दोन बंगल्यांमध्ये चोरी केली. अटक आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेली रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे, सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो कार, होंडा युनिकोन मोटरसायकल असा एकूण पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीकडे करण्यात आलेल्या अधिक तपासामध्ये ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्यामध्ये दाखल घरफोडीचे  19 गुन्हे उघडकीस येत आहेत. गुन्ह्याच्या पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव  करीत आहे. 
कोकण परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड व अपर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे, घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.

Web Title: Dacoity robbers arrested, in a day time they were selling ballons and at night dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.