बापरे! देशात ३० वर्षांत नक्षलवाद्यांकडून ५ हजारांवर आदिवासींची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:47 PM2021-03-15T19:47:27+5:302021-03-15T19:48:30+5:30
5 thousand Adivasi murdered by naxalist in 30 yrs : पोलीस विभागाची माहिती, ग्रामसभेकडून वसूल करतात खंडणी
गडचिरोली : ‘सत्ता ही बंदुकीच्या नळीतून हस्तगत होते’, या माओच्या तत्त्वानुसार काम करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गेल्या ३० वर्षांत देशभरात पाच हजारांवर आदिवासींची निर्घृण हत्या करून त्यांच्यात दहशत निर्माण केली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात मंगेझरी, मुरमुरी आणि जांभूळखेडा अशा विविध ठिकाणी त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात अनेक पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. असे असताना नक्षलवादी मानवाधिकारावर कोणत्या तोंडाने बोलत आहेत, असा सवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक (जनसंपर्क) डॉ. निलाभ रोहन यांनी उपस्थित केला आहे. नक्षलवाद्यांकडून सध्या पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांबाबत अपप्रचार करणारी पत्रके प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहन यांनी सदर पत्रक प्रसिद्धी माध्यमांना पाठवून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी पोलीस विभागाकडून काय प्रयत्न केले जात आहेत, आणि नक्षलवादी कसे आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे आणत आहेत, याची माहिती दिली. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित आहे. संविधानाच्या आधारेच स्थानिक आदिवासी नागरिकांना ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र त्याच ग्रामसभेकडून नक्षलवादी जबरदस्तीने खंडणी वसूल करतात, अशीही माहिती सदर पत्रकात देण्यात आली.
नक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घाबरून गेलेल्या नक्षलवाद्यांची मन:स्थिती बिघडली आहे. त्यातूनच ते पोलीस जवानांबाबत अपप्रचार करणारे तथ्यहीन पत्रकं प्रसारित करत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या कृतीबद्दल नागरिकांनी नक्षलवाद्यांचा निषेध करून सी-६० पथकातील जवानांचे अभिनंदन करावे, असे आवाहनही डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.