रामलीलामध्ये खुर्चीवर बसल्या प्रकरणी दलिताला मारहाण, अपमानामुळे केली आत्महत्या; पोलिसांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:26 AM2024-10-09T11:26:54+5:302024-10-09T11:26:54+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीने आत्महत्या केली.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दलीत व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी त्या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मृत व्यक्ती रामलीला पाहण्यासाठी गेला होता, त्यावेळी खुर्चीवर बसल्याप्रकरणी पोलिसांनी मारहाण केली. या अपमानामुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेली माहिती अशी, कोतवाली सोरोन परिसरातील सलेमपूर व्हीव्ही गावात एका दलित व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. त्या व्यक्तीच्या आत्महत्येमागील कारण पोलिसांकडून मारहाण आणि अपमान असल्याचे सांगितले जात आहे. रामलीला प्रांगणात खुर्चीवर बसल्याने दोन पोलिसांनी पतीला मारहाण केल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. कारवाईसाठी पत्नीने पोलिसांविरुद्ध सोरोण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मृत रमेश चंद यांचे जावई मनोज कुमार यांनी सांगितले की, ते रात्री ९.३० वाजता रामलीला पाहण्यासाठी गेले होते. तिथे खुर्च्या पडल्या होत्या म्हणून ते खुर्चीवर बसले. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल बहादूर सिंह आणि एक कॉन्स्टेबल विक्रम सिंह आले आणि त्यांना ओढत घेऊन गेले. तसेच मारहाण करून शिवीगाळ केली. त्यामुळे रमेश चंद यांना खूप दुखापत झाली. यानंतर त्यांनी घरी येऊन आम्हाला माहिती दिली. नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. या मंचावर त्या वेळी थोडे नशेत असलेले गावातील रमेश चंद स्टेजवर बसले होते. त्यावर आयोजक आणि प्रेक्षकांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. नंतर पोलिसांनी त्यांना तेथून बाजूला बसवले, यानंतर ते तिथून निघून गेले.