संतापजनक! चोरीचा आळ घेऊन दलित तरुणांना मारहाण, गुप्तांगामध्ये टाकले पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:27 PM2020-02-20T15:27:32+5:302020-02-20T15:48:20+5:30
Rajasthan : जातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे अजून एक भयाण उदाहरण समोर आले आहे.
जयपूर - जातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे भयाण रूप राजस्थानमध्ये दिसून आले आहे. येथील नागौरमध्ये चोरीच्या आरोपाखाली दोन दलित तरुणांना अमानूष मारहाण करून त्यांच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. या मारहाणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या घटनेतील दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी राजस्थान सरकारला केली आहे.
सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण स्वत:च्या बचावासाठी गयावया करत आहेत. तसेच मारहाण करणाऱ्यांची माफी मागत आहेत. मात्र आरोपींकडून कुठलीही दयामाया न दाखवता त्यांना मारहाण करण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे.
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातीली पांचौडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. येथील करणू सर्विस सेंटरमध्ये चोरी केल्याचा आरोप दोन तरुणांवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सर्विस सेंटरमधील कर्मचाऱ्यांना या तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 342, 323, 341, 143 आणि एसी/एटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 7 जणांचा समावेश असून, यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नागौरचे एएसपी राजकुमार आणि डीएसपी मुकुल शर्मा करत आहेत.
संबंधित बातम्या
संतापजनक! दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले
दोन दलित अल्पवयीनांची जमावाने केली हत्या
कायद्याने नष्ट केलेली जातिव्यवस्था समाजव्यवस्थेत कायम!
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.