शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर डल्ला, भिवंडीत युरिया खताचा काळाबाजार उघड
By नितीन पंडित | Published: October 15, 2022 12:58 PM2022-10-15T12:58:41+5:302022-10-15T13:09:18+5:30
शेतकऱ्यांच्या हक्काचे खत चोरीच्या मार्गाने गोदामात; नारपोली पोलिसांनी १७ लाखांचा निमकोटेड युरियाचा साठा केला जप्त
भिवंडी - शेतकऱ्यांसाठी अनुदान किमतीत शासन खत उपलब्ध करून देत असताना माफियां कडून शेतकऱ्यांच्या खतावर डल्ला मारून तो खत साठा व्यापारी उपयोगासाठी वापरात आणून बक्कळ नफा कमावणाऱ्या माफियावर नारपोली पोलीसांनी कारवाई करीत १७ लाख रुपयांचा निमकोटेड युरियाचा साठा गुरुवारी जप्त केला आहे.
पुर्णा येथील महालक्ष्मी वेअर हाउसच्या गोदामामध्ये निमकोटेड युरियाचे साठवणुक करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणुक केली जात आहे अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळाली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील,ब्रिजेश शिंदे,कळवा पोलीस ठाणे येथील सपोनि निलेश कानडे व पथकाने गोदामावर छापा टाकला.ज्यामध्ये गोदाम मालक प्रफुल्ल चंद्रकांत देशमुख,रा.नवी मुबंई यांच्या गोडावुनमध्ये साठवलेला व तेथे उभ्या असलेल्या ट्रक मध्ये ५० किलो वजनाच्या १७८६ गोणी निमकोटेड व संशयित साठवणुक केलेल्या युरियाचा १६ लाख ९६ हजार ७०० रुपये किमतीचा खत व मुद्देमाल जप्त केला आहे .
नारपोली पोलिसांनी जप्त केलेल्या निमकोटेड युरिया खताचे नमुने ठाणे कृषी विभाग यांच्या मदतीने नाशिक येथील खत चाचणी प्रयोगशाळा येथे तपासणी साठी पाठविले.तेथील अहवाल नुसार सदरचा युरिया हा शेतीसाठी खत म्हणून उपयोगात येणारा असल्याचे स्पष्ट झाल्याने ठाणे कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विजय तुपसौदर्य यांनी दिलेल्या तक्रारी वरून योग फारमा कंपनी व इतर संशयितांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाणे येथे फसवणुकीसह खत नियंत्रण व अत्यावश्यक वस्तु अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिलेला खत साठा काळ्या बाजारात-निमकोटेड युरियाची साठवणुक पुर्णा येथील आडवळणाच्या जागेत असलेल्या गोदामात सुरू होती.त्यामुळे पोलिसांच्या अथवा कोणाच्या नजरेस हा काळ्या बाजारातील खत साठा लक्षात येत नव्हता.पोलीसांनी खबऱ्याच्या मदतीने पाळत ठेवुन सापळा लावुन निमकोटेड युरियाची साठवणुक करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे पोलीस तपासात समोर येतील त्यानुसार आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तपास अधिकारी चेतन पाटील यांनी व्यक्त केली आहे.कृषी सोसायटी मार्फत अथवा शासनमान्य कृषी सेवा केंद्रातून विक्री साठी अत्यल्प दरात खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते.अशाच ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या हक्काचा खताचा साठा माफिया काळ्या बाजारात विक्री साठी साठवीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.