दामदुप्पट पैसे देतो, म्हणत ५२ लाखांची फसवणूक; उरणमध्ये चिटफंडद्वारे गंडा : तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:27 AM2023-12-23T09:27:26+5:302023-12-23T09:27:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दामदुप्पटच्या नावाखाली पैसे जमा करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : दामदुप्पटच्या नावाखाली पैसे जमा करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ५२ लाखांची फसवणूक केल्यास समोर आले आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चिटफंडचे प्रकार चालत आहेत. अल्पावधीत नागरिकांना मोठ्या मोबदल्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली जात आहे. मात्र, ठरावीक कालावधीनंतर संबंधितांकडून पोबारा केला. यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून अशाच दोन प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सतीश गावंड, सुप्रिया पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांनी ४०० कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याची शक्यता आहे. अशातच उरण परिसरातच दोन वर्षांपासून चालणारा नवा चिटफंड समोर आला आहे. तक्रारदार व रक्कम यात वाढ होण्याची शक्यता आहे.
३० दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष
n तक्रारदार हरेश पयेर व त्यांच्या परिचितांनी अक्षय भोईर, वनमाला भोईर व श्याम भोईर यांच्याकडे पैसे गुंतवले होते. या तिघांनी त्यांना तीस दिवसात दुप्पट रक्कम देण्याची हमी दिली होती.
n तसेच दोन वर्षांपासून त्यांची स्कीम चालू असल्याचेही सांगितले होते. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले होते. परंतु, मुदत पूर्ण झाल्यानंतर अनेकांना देण्यात आलेले धनादेश वटले नाहीत.
n शिवाय गुंतवणुकदारांना प्रतिसादही मिळायचा बंद झाला. यामुळे गुंतवणुकदारांनी उरण पोलिसांकडे तक्रार केली असता तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.