माझ्या जीवाला धोका; क्रूझवरील कारवाईवेळी मी तिथे नव्हतो; मनीष भानुशाली यांनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:15 PM2021-10-06T18:15:49+5:302021-10-06T18:16:19+5:30
Manish Bhanushali Reaction : १ तारिखच्या दुपारी माझ्या काही गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या देशाच्या युवा पिढीला कमजोर करणारी ही घटना असल्याने मी ही माहिती एनसीबीला दिली.
क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र तो आमचा अधिकारी नव्हता, असं एनसीबीनं सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असे अनेक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. नवाब मलिक यांनी ज्या मनीष भानुशाली यांच्यावर आरोप केले. त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना माझ्या जीवाला धोका असून मी क्रूझवर केलेल्या कारवाईवेळी क्रूझवर नव्हतो असं सांगितलं.
तसेच १ तारिखच्या दुपारी माझ्या काही गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या देशाच्या युवा पिढीला कमजोर करणारी ही घटना असल्याने मी ही माहिती एनसीबीला दिली. मी भाजपाचा एक कार्यकर्ता आहे. २ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता मी एनसीबी कार्यालयाला गेलो आणि माहिती दिली. त्यावेळी समीर वानखेडे यांनी मला तुम्हाला ही माहिती कशी आणि कोणी दिली असं विचारलं. त्यावर मी माहिती देणाऱ्याचे नाव जर सांगितले तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो असं मी सांगितलं. त्यावेळी एनसीबीकडे देखील याबाबत माहिती होती. पण माझ्याकडे थोडी अधिक माहिती होती. मी देशहीतासाठी काम करणारा माणूस म्हणून मी माहिती एनसीबीला दिली अशी प्रतिक्रिया भानुशाली यांनी दिली.
माझं नाव पुढं आल्यानंतर माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कारवाईच्यादिवशी मी ग्रीन गेटजवळ गेलो होतो. पण क्रूझवर नव्हतो. एवढी लोक पकडली जातील अस वाटलं नव्हती म्हणून गरजेनुसार मदत केली. गाड्या देखील कमी पडल्या होत्या. मला देखील माझा जबाब नोंदवण्यासाठी एनसीबी कार्यालयात जायचं होतं. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या गाड्यांचीही आरोपींना एनसीबी कार्यालयात नेण्यासाठी मदत घेतली. मी आरोपींना आणताना मदत केली हे सत्य आहे.