सिन्नर तालुक्यातील दापूर, दोडी शिवारात घरफोडी, तिघांना मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 12:22 PM2023-07-07T12:22:25+5:302023-07-07T12:22:45+5:30

चोरट्यांनी या घटनेत सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पाच हजार रुपयांची रोख रक्कम लांबवलयाचे सांगण्यात येते.

Dapur in Sinnar taluka, house burglary in Dodi Shivara, three beaten up | सिन्नर तालुक्यातील दापूर, दोडी शिवारात घरफोडी, तिघांना मारहाण 

सिन्नर तालुक्यातील दापूर, दोडी शिवारात घरफोडी, तिघांना मारहाण 

googlenewsNext

- सचिन सांगळे 

नांदूरशिंगोटे (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील दापूर आणि दोडी शिवारात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत दाम्पत्याला जबरी मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी काकडवस्ती व सदगीर वस्ती अशा दोन ठिकाणी घरफोडी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोन ठिकाणी घरातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून दोन महिला जखमी झाल्या.  तर एका पुरुषाची प्रकृती अत्त्यवस्थ आहे. चोरट्यांनी या घटनेत सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पाच हजार रुपयांची रोख रक्कम लांबवलयाचे सांगण्यात येते.

दोडी-दापूर रस्त्यावर दापूर शिवारात काकड मळा येथील छबू हरी आव्हाड यांचे घराचा दरवाजा उघडून मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी प्रवेश केला. आव्हाड यांचा मुलगा सुनील व त्याची पत्नी सविता हे दोघे झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी मोर्चा वळवला. हातातील लोखंडी वस्तूंनी या दोघांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी पत्नी सविता हिच्या अंगावरील व घरातील सुमारे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने व घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. 

या मारहाणीत सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नांदूरशिंगोटे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. कान ते हनुवटी दरम्यान  मोठी जखम असल्याने त्यांना जवळपास चाळीस टाके टाकण्यात आले. तर सविता आव्हाड या देखील जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दापूर रस्त्यावरील दोडी खुर्द शिवारातील सदगीर वस्तीवरील भारत बन्सी सदगीर यांच्या वस्तीवर चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी दरवाज्याची आतून लावलेली कडी उघडत प्रवेश केला. 

यावेळी ताई भारत सदगीर यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हस्तगत केले. ताई सदगीर यांच्या कानाची पाळी देखील तुटली. दरम्यान सदगीर वस्ती जवळ असलेल्या बाळू विठ्ठल केदार यांच्या घराच्या पडवीचा सेफ्टी डोअर उघडून चोरट्यांनी पडवीत असलेली जुनी लोखंडी पेटी उचलून नेली. या पेटीत शेती अवजारे व पाईपलाईनचे लोखंडी सुट्टे भाग ठेवलेले होते. शेजारीच असलेल्या तात्याबा दामोदर आव्हाड यांच्या घराचा आतून बंद असलेला दरवाजा उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने ते पळून गेले. 

जाताना चोरट्यांच्या हातातील कटावणी, लोखंडी गज या वस्तू आव्हाड्यांच्या अंगणात पडलेल्या असल्याचे समजते. दरम्यान याबाबत माहिती मिळाल्यावर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिन्नर, एमआयडीसी तसेच जिल्हा पोलीस मुख्यालयातील दरोडा प्रतिबंधक गस्तीवरील वाहने देखील दापूर येथे दाखल झाली. पहाटेपर्यंत परिसरात संशयितांचा शोध घेतला जात होता. सकाळी रुग्णालयात जाऊन पोलिसांनी जखमींचा जाबजबाब घेतला.

Web Title: Dapur in Sinnar taluka, house burglary in Dodi Shivara, three beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.