दत्ता पडसलगीकर बनले उपलोकायुक्त; प्रस्तावाला राज्यपालाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:01 PM2019-03-06T22:01:11+5:302019-03-06T22:03:22+5:30
पोलीस दलात ३७ वर्षे सेवा बजाविल्यानंतर दत्ता पडसलगीकर २८ फेबु्रवारीला सेवानिवृत्त झाले होते.
जमीर काझी
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सहा दिवसापूर्वी पायउतार झालेले दत्ता पडसलगीकर यांचा पुन्हा शासकीय सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात ते पुन्हा पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर उप लोकायुक्त म्हणून जनतेची गाऱ्हाणे सोडविणार आहेत. राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीबद्दल बनविलेल्या प्रस्तावाला राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी हिरवा कंदील दाखविला आहे.
पोलीस दलात ३७ वर्षे सेवा बजाविल्यानंतर दत्ता पडसलगीकर २८ फेबु्रवारीला सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर आठवड्याभरातच राज्य सरकारने त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविली आहे. १९८२ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या पडसगलीकर यांची गेल्यावर्षी ३० आॅगस्टला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र या पदावर त्यांना केवळ दोन महिन्याचा कार्यकाळ मिळत असल्याने राज्य सरकारने त्यांना दोन टप्यात प्रत्येकी तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्याशिवाय त्यांना जून २०२० पर्यत पोलीस महासंचालक म्हणून मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला होता. मात्र त्यांच्या मुदतवाढीबद्दल अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी नाराज असल्याने त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील पडसलगीकर यांना २८ फेबु्रवारीला पदावरुन पायउतार होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र रिटायरमेंट नंतरही राज्य सरकारने त्यांना उपलोकायुक्त बनवून त्यांच्यावर पुन्हा महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतच्या प्रस्तावाला राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी स्वाक्षरी करीत शिक्कामोर्तब केले.