दत्ता पडसलगीकर यांना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 09:08 PM2018-11-29T21:08:19+5:302018-11-29T21:09:38+5:30
दुसऱ्यांदा मुदतवाढ; वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर
जमीर काझी
मुंबई - राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून उद्या त्याबाबतचे आदेश जारी होईल, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पडसलगीकर यांना निवृत्तीनंतर दोन टप्यात सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे. अशा पद्धतीने गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यादाच ‘डीजीपी’ पदासाठी मुदतवाढ मिळत आहे.
गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत केवळ एस.एस.विर्क आणि अजित पारसनीस यांनाच प्रत्येकी तीन महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. दरम्यान, पडसलगीकर यांच्या मुदतवाढीमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या बढतीला विलंब लागत असल्याचा त्यांच्यातून आक्षेप व्यक्त होत आहे. त्याशिवाय मुंबईचे आयुक्तपद आणि डीजी दर्जाच्या अन्य नियुक्त्यांवर परिणाम होणार आहे.
दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून गेल्या एक जुलैपासून राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची सूत्रे सांभाळीत आहेत. त्यापूर्वी जवळपास सव्वा दोन वर्षे मुंबईच्या आयुक्तपदी आणि त्यापूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. निवृत्तीच्या वयामुळे ‘डीजीपी’पदावर केवळ दोन महिन्याचा अवधी मिळत असल्याने राज्य सरकारकडून त्यांना ३१ आॅगस्टला पहिल्यादा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्याची मुदत शुक्रवारी संपत असून त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोण आहेत डीजीपी पदाच्या रेसमध्ये?
पडसलगीकर यांच्यानंतर मुंबईचे आयुक्त सुबोध जायसवाल, संजय पांडे (होमगार्ड), संजय बर्वे (एसीबी), बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण), सुरेंद्र पांडे (कारागृह), डी.कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे (विधी व तंत्रज्ञ) हे महासंचालक सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या मुदतवाढीमुळे या सर्वांच्या पोस्टींगवर तसेच अप्पर महासंचालक दर्जाची बढती लांबली गेली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विश्वासातील व प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रतिमा असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दत्ता पडसलगीकर यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक व मितभाषी अधिकारी अशी आहे. त्यांच्याबद्दल खात्यामध्ये आदर आहे. मात्र त्यांना मुदतवाढ मिळाल्याने उपायुक्तापासून डीजीपर्यंतच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या प्रमोशन व बदलीवर परिणाम होतो, हा अप्रत्यक्ष अन्याय असल्याची भावना आयपीएस अधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे.