३ कोटींसाठी मुलीनं केला छळ; आई-बापाला बंद खोलीत ४ महिने कैद केले, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:10 PM2023-06-23T19:10:56+5:302023-06-23T19:11:43+5:30
हे प्रकरण हबीबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. अरेरा कॉलनी बँकेचे निवृत्त अधिकारी सीएम सक्सेना राहतात.
भोपाळ - ३ कोटी रुपयांसाठी भोपाळच्या पॉश परिसरात एका मुलीनं स्वत:च्या आई-बापाला आणि भावाला घरात कैद केले. वडील बँकेतील निवृत्ती अधिकारी आहेत. मुलीने आधी वडिलांच्या घरावर कब्जा केला त्यानंतर त्यांच्याकडे ३ कोटींची मागणी केली. इतक्यावर ती थांबली नाही तर तिने वडील, आई आणि भावाला घराच्या एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली. त्यांना कुणालाही भेटू दिले नाही. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४ महिन्यांनी अखेर पोलिसांनी रेस्क्यू करत या तिघांची सुटका केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले.
हे प्रकरण हबीबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. अरेरा कॉलनी बँकेचे निवृत्त अधिकारी सीएम सक्सेना राहतात. त्यांचे वय ८० आहे. सक्सेना यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत असतात. मुलगा मानसिक आजारी आहे. अरेरा कॉलनीत ज्या फ्लॅटमध्ये ते राहतात त्याची किंमत १ कोटींहून अधिक आहे. सक्सेना यांनी मुलीचे लग्न २००२ मध्ये लखनऊमध्ये केले. जावई आर्मीत आहे. काही दिवसांपर्यंत सर्वकाही ठीक सुरू होते.
मुलीनं केला घरावर कब्जा
२०१६ मध्ये मुलीचं सासरी भांडण झाले. त्यानंतर पतीने तिला घटस्फोट दिला. मुलगी तिच्या २ मुलांसह आई वडिलांच्या घरी राहायला आली. याठिकाणी सर्वात आधी तिने वडिलांकडून एटीएम कार्ड हिसकावले आणि अकाऊंटमधून सर्व पैसै काढले. त्याचसोबत ३ कोटींची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास मनाई केली तेव्हा मुलीने तिच्या मुलांना सोबत घेत त्यांना मारहाण केली.
४ महिन्यांपूर्वी एका खोलीत कैद केले
पैसे न मिळाल्याने संतापलेल्या मुलीची क्रूरता आणखी वाढली. तिने आई वडिलांना मारहाण केली. ४ महिने आई वडील आणि भावाला एका खोलीत कोंडले. तिथे त्यांना खायलाही काही दिले नाही. आई वडिलांना फक्त १ चपाती देत होती. जेवण मागितल्यावर मुलगी प्लॅस्टिकच्या पाईपने त्यांना मारहाण करायची. तिच्यासोबत तिची मुलेही मारहाण करायची. या तिघांना खोलीतून बाहेर पडण्यासही मनाई होती.
मित्राच्या तक्रारीवरून कारवाई
सीएस सक्सेना यांना १९ जूनला त्यांचा मित्र भेटायला आला. खूप दिवस सक्सेना भेटले नव्हते त्यामुळे विचारपूस करण्यासाठी मित्र घरी पोहचला. घरी आलेल्या वडिलांच्या मित्रांसोबत मुलीने गैरवर्तन केले. त्यांना हाकलवून घराबाहेर काढले. त्यामुळे काहीतरी विपरीत घडलंय ही शंका घेऊन ते थेट पोलीस स्टेशनला पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांना रेस्क्यू करून घराबाहेर काढले. पोलिसांनी रेस्क्यू केल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. शरीर अशक्त झाल्यामुळे सर्वात आधी जेवण द्या अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. वडिलांचे घर विकून पैसे देण्यासाठी मुलगी वडिलांवर दबाव बनवायची. त्याचसोबत वडिलांनी मिळणारी पेन्शन रक्कम मुलगी दरमहिन्याला बँकेतून काढायची. अनेक कागदपत्रांवर तिने सह्या घेतल्या होत्या. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मुलगी आणि तिच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.