पोरीमुळं बापाचा क्रूर चेहरा उघड झाला; थेट पोलीस स्टेशन गाठत हत्येचा उलगडा केला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:47 PM2021-10-27T12:47:29+5:302021-10-27T12:49:17+5:30
कन्हैयाने ज्या युवकाची हत्या केली त्याचं नाव अजेश वर्मा असं आहे. त्याचे वय २८ आहे. तो व्यवसायाने मजूर होता.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे १३ वर्षाच्या मुलीनं स्वत:च्या वडिलांना जेलच्या कोठडीत पाठवलं आहे. सिंगोडी जिल्ह्यातील पिपरिया घटोरी गावातील १३ वर्षीय मुलीनं वडिलांनी केलेल्या निर्दयी कृत्याविरोधात आवाज उचलला. मुलीने पोलीस स्टेशन गाठत वडिलांविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. मुलीच्या वडिलांनी एका युवकाला बेदम मारहाण करत हत्या केली त्यानंतर मृतदेह जंगलात दफन केला.
वडिलांचे हे कृत्य पाहून मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीचं नाव कन्हैया बारसिया आहे. पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरु केली तेव्हा आरोपी हडबडला. परंतु जेव्हा मुलीने वडिलांच्या समोर पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा आरोपी वडील हैराण झाला आणि त्याने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ज्याठिकाणी मृतदेह दफन केला तिथे घेऊन गेली. त्याठिकाणी मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवण्यात आला.
काय आहे हे प्रकरण?
एसडीओपी संतोष डेहरिया यांनी सांगितल्याप्रमाणे, कन्हैयाने ज्या युवकाची हत्या केली त्याचं नाव अजेश वर्मा असं आहे. त्याचे वय २८ आहे. तो व्यवसायाने मजूर होता. आरोपी कन्हैयासोबत अजेश वर्माची ओळख नव्हती. सोमवारी संध्याकाळी अजेश वर्मा बाईकवरुन घराच्या दिशेने परत जात होता. तेव्हा रस्त्यात कन्हैया त्याला भेटला. कन्हैयाने अजेशला लिफ्ट मागितली. त्यानंतर दोघांनी पिंडरई इथं एकत्र दारु प्यायली. त्यानंतर अजेशने कन्हैया भूक लागली असल्याचं सांगितले. त्यानंतर कन्हैया अजेशला घेऊन घरी आला.
यावेळी कन्हैया आणि अजेश यांच्यात काही गोष्टीवरुन वाद झाला. त्यानंतर कन्हैया अजेशला घेऊन जंगलाच्या दिशेने गेला. तिथं फरशी डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात दफन केला. हा सगळा प्रसंग आरोपी कन्हैयाच्या मुलीने पाहिला. मुलगी ५ वीच्या वर्गात शिकते. कन्हैयाच्या पत्नीचा याआधीच निधन झालं आहे. कन्हैया नेहमी मुलीला मारहाण करायचा. त्यामुळे ती खूप वैतागली होती. त्यानंतर वडिलांनी हत्या केल्याचं पाहून मुलगी आणखी घाबरली. तिने गावातील एका व्यक्तीला ही घटना सांगितली. त्यानंतर त्या व्यक्तीने मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन सगळी हकीकत पोलिसांना सांगितले.