फेसबुकवरील मित्रासाठी सुनेने चोरले घरातील २२ तोळे सोन्याचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:13 PM2019-08-29T22:13:40+5:302019-08-29T22:14:11+5:30

फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी सुनेने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे.

Daughter-in-law stole gold jewelry for a friend on Facebook | फेसबुकवरील मित्रासाठी सुनेने चोरले घरातील २२ तोळे सोन्याचे दागिने

फेसबुकवरील मित्रासाठी सुनेने चोरले घरातील २२ तोळे सोन्याचे दागिने

Next

हिंगणघाट (वर्धा) -  फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी सुनेने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी सुनेला तिच्या मित्रासहित अटक केली आहे. हिंगणघाट येथील सुधाकर विठोबाजी कदम यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. घरातून कोणी अज्ञात व्यक्तीने कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं होतं. तक्रारीत पाच लाख रूपये किंमतीचे २२ तोळे सोने चोरी झाल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं होतं.

हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी तक्रार करताना कदम कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली. यावेळी छोटी सून थोडी घाबरलेली आणि प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत असताना जाणवलं. संशय आल्याने तिची कसून चौकशी करण्यात आली. शेवटी तिने धनंजय जाधव नावाच्या व्यक्तीला मदत केल्याचे कबुल केले.

फेसबुकच्या माध्यमातून तिची धनंजय जाधवसोबत ओळख झाली होती. ती आरोपी धनंजयच्या सतत संपर्कात होती. ओळख वाढल्यावर आरोपीने त्याच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याचे सांगत उपचार करण्यासाठी मदत मागितली. त्याची भुरळ पडलेल्या सुनेने शेवटी घरातील दागिने लंपास केले. तिने एकाच वेळी सगळे दागिने चोरले नाही. चार वेळा चोरी करत तिने एकूण २२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

यानंतर पोलिसांनी धनंजय जाधव याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण या नावाचा ईसम अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोपीचा शोध -घेणे कठीण झाले होते. मात्र पोलिसांनी एका माहितीच्या आधारे नांदेडला चौकशी केली. मोबाइलच्या आधारे हा आरोपी नांदेडातील सिडको परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. शेवटी आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याने आपले नाव धनंजय नसून अविनाश गणपत भालेराव असल्याचे सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याला हिंगणघाटला आणले व आरोपी सुनेसमोर उभे केले. घरून चोरलेले दागिने याच व्यक्तीला दिल्याचे तिने सांगितल्यावर पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने घरी व काही नांदेडच्या उत्तम ज्वेलर्सला विकल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपीच्या घरून बारा तोळे सोन्याचे दागिने व सुवर्णकार उत्तम लोलगे यांच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपी अविनाश व सुनेला न्यायालयात हजर करून सात दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक सत्यवीर बंडीवार व उपनिरिक्षक परमेश्वर आगासे यांनी हा गुन्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात उघडकीस आणला. 

Web Title: Daughter-in-law stole gold jewelry for a friend on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.