दाऊदच्या ‘डोळा’ची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त, ३२७ कोटींचे एमडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:38 AM2024-07-04T09:38:08+5:302024-07-04T09:38:25+5:30
१५ जणांना ठोकल्या बेड्या; एमडी तयार करणारी आंतरराज्य टोळी
मीरा रोड : अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित असलेला मॅफेड्रॉन (एम.डी.) बनवणारा कारखाना तेलंगणात उद्ध्वस्त करण्यात आला. ड्रग्ज बनवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा-१ ने देशभरातील विविध राज्यांतून १५ जणांना बेड्या ठोकल्या.
या कारवाईदरम्यान ३२७ कोटी ६९ लाख ४३ हजार रुपयांचे एम.डी. हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी बुधवारी दिली. दाऊदचा हस्तक सलीम डोळा हा व्यापारी झुल्फिकार कोठारीमार्फत तस्करीचा व्यवहार करीत असल्याचे समोर आले असून, मुंबईतील मुस्तफा फर्निचरवाला या अंगडियामार्फत हवाल्याची रक्कम पाठवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये एमडी विक्रीसाठी आणल्याची माहिती मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शोएब हनीफ मेमन व निकोलस लिओफ्रेड टायटस यांना वाहनांसह ताब्यात घेतले. वसईत राहणाऱ्या या दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे २ कोटी रुपयांचे एक किलो एमडी आढळले. या प्रकरणी काशीगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान शोएबने दिलेल्या माहितीवरून पोलिस पथकाने तेलंगणा राज्यातील दयानंद ऊर्फ दया माणिक मुद्दनार व नासीर ऊर्फ बाबा जानेमिया शेख (दोघेही रा. हैदराबाद) यांना १७ मे रोजी राजेंद्रनगर सायबराबाद येथून अटक केली.
मुंबई-ठाणे-यूपी कनेक्शन
दयानंदच्या चौकशीनंतर घनश्याम रामराज सरोज (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) यालाही वाराणसी येथून अटक केली, तर मोहम्मद शकील मोहम्मद मोईन (रा. हैदराबाद, तेलंगणा) याला मुंबईच्या गोरेगाव येथून अटक केली. त्याच्याकडून कारसह १४ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ७१.९० ग्रॅम एमडी जप्त केले. भरत ऊर्फ बाबू सिद्धेश्वर जाधव (रा. वाशिंद, शहापूर) याला गणेशपुरीमधून अटक केली. त्याच्याकडून तो राहत असलेल्या पडघा येथील लाप बुद्रुक गावातील घरातून ५३ हजार रुपयांचे एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य व रसायने जप्त केली गेली.
अमली पदार्थांची मोठी टोळी सक्रिय
अमली पदार्थांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर वाराणसी, महाराष्ट्र आणि गुजरात आदी भागांत शोधमोहीम राबवून तस्करी करणारे बाबू खान, मोहम्मद खान आणि अहमद शाह या तिघांना उत्तर प्रदेशातील आझमगड येथून अटक केली. २५ जून रोजी आमिर खान, मोहम्मद शादाब आणि वीरेंद्र सिंग यांनाही उत्तर प्रदेशच्या आझमगडमधून पकडले. अभिषेक सिंहला नालासोपारातून पकडले. या कारवाया मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे या पथकाने कारवाई केली.
२५ किलो मेफेड्रोन जप्त
दयानंद शेट्टी याने मेफेड्रोन बनविण्याचा कारखाना तेलंगणातील मंडळ मारपल्ली येथील नरसापूरमध्ये (जि. विकाराबाद) सुरू केला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे धाड टाकून २० लाख ६० हजार रुपयांचे १०३ ग्रॅम मेफेड्रोन आणि २५ कोटींचे मेफेड्रोन बनवण्यासाठी लागणारे रसायन व अन्य साहित्यांसह २५ किलो कच्चे मेफेड्रोन जप्त केले.
गुजरातच्या व्यापाऱ्याचा सहभाग
तपासामध्ये एमडी बनविण्यासाठी लागणारे पैसे व एमडी विकून मिळालेले पैसे याची देवाणघेवाण सलीम डोळा (रा. मुंबई) हा करीत होता. झुल्फिकार ऊर्फ मूर्तझा मोहसीन कोठारी हा गुजरातच्या सुरतमधून अमली पदार्थांची तस्करी, उत्पादन, पुरवठा करीत होता. त्याला ३१ मे रोजी ताब्यात घेतले. त्यास सलीम डोळा याने पाठविलेले १० लाख ८४ हजार रुपये रोख हस्तगत केले आहेत.