दाऊद टोळीतील अट्टल गुन्हेगार पुण्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 11:59 AM2019-04-11T11:59:28+5:302019-04-11T12:00:20+5:30
गेली ५ ते ६ वर्षे तो पुण्यात आपली ओळख लपवून राहत होता.
पुणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. संतोष गोपाळ नायर (वय ४५, रा़ टिंगरेनगर) असे त्याचे नाव आहे. गेली ५ ते ६ वर्षे तो पुण्यात आपली ओळख लपवून राहत होता. पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या हवाली केले आहे.
संतोष गोपाळ नायर हा सराईत गुन्हेगार २००४ पासून दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी,खंडणी असे ४० ते ४५ गुन्हे दाखल आहेत. मात्र २००४ साली त्याने मुंबईत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. तो मागील ५ ते ६ वर्षांपासून पुण्यात राहत होता. तो मोबाईल वापरत नव्हता. पत्नीच्या नावावरच तो मोबाईल वापरत होता. तसेच आपली ओळख लपविण्यासाठी तो पुण्यात लोकांमध्ये मिसळत नव्हता. तो कोणाशीही संपर्क ठेवत नव्हता. त्याने विमाननगर भागात खानावळ सुरु केली होती.
मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेने त्याच्याबाबत विश्रांतवाडी पोलिसांना माहिती दिली़ त्यानंतर अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी संजय कांबळे व भोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.