दाऊद टोळीच्या परवेझ मेमनला अटक; टेरर फंडिंगप्रकरणी एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 10:35 AM2022-08-05T10:35:03+5:302022-08-05T10:35:20+5:30
परवेझ गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद टोळीशी संबंधित असून, तो खंडणी व इतर गुन्ह्यांमध्ये फरार होता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याच्या प्रकरणात दाऊद टोळीच्या परवेझ झुबेर मेमन (४७) याला महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. अंधेरीतील राहत्या घरात मेमनवर अटकेची कारवाई करण्यात आली.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा हस्तक अनिस इब्राहिम व त्याचे साथीदार बेकायदा कृत्यांमधून मिळालेल्या पैशांचा वापर भारतात दहशतवादी कारवायांसाठी करतात. याप्रकरणी एटीएसच्या काळा चौकीत २ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू करण्यात आला. याच टोळीमध्ये परवेझचाही सक्रिय सहभाग असल्याचे उघड होताच त्यालाही बुधवारी अंधेरीतून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो अंमली पदार्थांचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले. ड्रग्ज तस्करी आणि अन्य गैरकृत्यांतून मिळालेला पैसा भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी संघटना व हस्तकांना पुरवित असल्याचे स्पष्ट होताच परवेझवर अटकेची कारवाई करण्यात आली.
परवेझ गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद टोळीशी संबंधित असून, तो खंडणी व इतर गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्यानंतर तो दुबई येथे पळून गेला. दुबईमध्ये राहून त्याने आपल्या बेकायदा व्यवसायात जम बसविला. तो सध्या अनिस इब्राहिम याच्यासोबत देशविरोधी कटामध्ये सहभागी असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एटीएसने सांगितले.