दाऊदला झटका! हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा झाला १ कोटी ८० लाखाला लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:14 PM2019-04-01T13:14:21+5:302019-04-01T13:15:26+5:30
हसीना पारकरच्या नागपाडा येथील येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकरच्या नागपाडा येथील येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून आज लिलावात गार्डन हॉलमधील फ्लॅट १ कोटी ८० लाखांना विकण्यात आला आहे.
२०१४ रोजी हसीनाच्या मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती तसेच देश सोडून फरार होण्याआधी कुख्यात गुंड दाऊद हा देखील याच फ्लॅटमध्ये राहत होता. 2014 रोजी हसीना पारकरच्या मृत्यूनंतर धाकटा भाऊ इक्बाल कासकर तेथे रहायचा. 2017 मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला तेथूनच बेड्या ठोकल्या होत्या. सीबीआयने १९९७ साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. सफेमा यांनी दाऊदच्या गार्डन हॉल अपार्टमेंटमधील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तसेच लिलावासाठी १ कोटी ६९ लाख किंमत ठरविण्यात आली होती.
सफेमा कायद्याअन्वये तस्करी व बेकायदेशीर कृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. या कायद्याच्या कलम 68 फ अंतर्गत तस्कर करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईंच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतुद आहे. ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्याअंतर्गत कामकाज अथवा कारवाई करते. त्यांना 1998 मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. हसीना पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एप्रिल 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. दाऊदच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानुसार या घरावर टाच आणली असून पुढच्या कारवाईनुसार या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा देखील सहभाग होता. गेल्या वर्षी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक म्हणजे 11.58 कोटी रुपयांची लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला आहे.
मुंबई - कुख्यात गुंड दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा लिलाव https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 1, 2019