पाकिस्तानात बसून दाऊदचं भारताविरोधात षडयंत्र; NCB नं केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 06:04 PM2022-11-05T18:04:35+5:302022-11-05T18:05:08+5:30
देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डी गँग आणि ड्रग्जचा काळा धंदा करणाऱ्यांमध्ये संबंध वाढले आहेत.
नवी दिल्ली - भारत हा नेहमीच पाकिस्तान, अंडरवर्ल्ड माफिया आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. या सर्वांचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे. गेल्या काही काळापासून कराचीत बसलेल्या प्रमुख दहशतवाद्यांनी भारतात अशांतता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करत आहे. दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉनच्या मदतीने देशातील तरुणांना बिघडवण्याचा कट पाकिस्तान रचत आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विविध यंत्रणांनी आता मोठा खुलासा केला आहे.
देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डी गँग आणि ड्रग्जचा काळा धंदा करणाऱ्यांमध्ये संबंध वाढले आहेत. NCB ने नुकतेच भारतीय नौदलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत ६० किलो उच्च दर्जाचे एमडी ड्रग जप्त केले होते. ज्याची किंमत अंदाजे १२० कोटी रुपये होती. त्याचवेळी नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि मुंबई विमानतळावरील सफरचंद संत्र्याच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेले ५० किलोहून अधिक कोकेन यांची किंमत ५०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. पकडलेल्या या सर्व ड्रग्जच्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर एनसीबीला धक्कादायक माहिती मिळाली.
दाऊद इब्राहिम मोठा कट रचतोय
एनसीबीच्या अधिका-यांनी सांगितले की, दीड वर्षात एनसीबीने आठ यशस्वी ऑपरेशन्स केले, त्यानंतर या सर्व ड्रग्समध्ये एक पॅटर्न आढळला ज्यांचे कनेक्शन दाऊद इब्राहिम, ड्रग माफिया हाजी सलीम आणि पाकिस्तानात बसलेल्या इसिसशी आहे. NCB झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी सांगितले की, अंमली पदार्थांची ही संपूर्ण खेप अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमधून सतत येत आहे. ती भारतासाठी घातक बनली आहे. या मार्गाने तस्कर केवळ ड्रग्जच नव्हे तर एके ४७ सारख्या धोकादायक शस्त्रांचीही तस्करी करतात, असा खुलासा या अधिकाऱ्याने केला आहे. मात्र हे गुन्हेगार इतके हुशार आहेत की ते वेळोवेळी आपले मार्ग बदलत असतात.
मुंबई टार्गेटवर
जर त्यांना मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करायचा असेल तर ते आधी देशाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर ड्रग्सची खेप उतरवतात. नंतर त्यांच्या नेटवर्कद्वारे पुरवठा करतात. कराचीहून येणारी हे ड्रग्स इराणी बोटींच्या मदतीने भारतात येतात. हे तस्कर बोटींचाही सहारा घेतात जेणेकरून पकडले गेल्यास ते ड्रग्जच्या खेपेचे पुरावे नष्ट करण्यासाठी समुद्रात फेकून देऊ शकतात. एनसीबीने सांगितले की, डी गँगचे हे तस्कर भारताच्या वापर करून इतर देशांमध्ये ड्रग्सचा पुरवठा करतात. या खुलाशानंतर देशात वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापात अनेक तरुण मुले येत आहेत आणि ही संख्या वाढत आहे अशी भीती यंत्रणांना वाटते. या ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेला पैसा हे दहशतवादी शस्त्रास्त्रांच्या खरेदीत वापरतात. त्यामुळे एजन्सी याकडे देशाविरुद्ध प्रॉक्सी वॉर म्हणून पाहत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"