Dacoity Case : पिस्तुलाच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा
दिवसाढवळ्या फिल्मीस्टाईल दरोडा; सराफाचे हात तोंड बांधून बेदम मारहाण करून दागिने लुटले
ठळक मुद्देचार लाखांची रोकड आणि दागन्यांसह २० ते २५ लाखांचा ऐवज लंपासवर्दळीच्या भागात दिवसाढवळ्या गुन्हा; शहरात खळबळ, पोलिसांची धावपळ
नागपूर - पिस्तुलाच्या धाकावर सराफा व्यावसायिकाला बेदम मारहाण करून चार दरोडेखोरांनी सराफा दुकानातून सुमारे साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २० ते २५ लाखांचा ऐवज लुटून नेला. सोमवारी दिवसाढवळ्या जरीपटक्यातील अत्यंत वर्दळीच्या नारा मार्गावर ही दरोड्याची घटना घडली. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जरीपटक्यातील भीम चाैकाजवळ नागसेननगर आहे. अत्यंत वर्दळीचा हा परिसर आहे. मुख्य रस्त्यावर एका छोट्याशा गाळ्यात अवनी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास ज्वेलर्सचे संचालक आशिष रवींद्र नावरे (वय ३५, रा. ठवरे कॉलनी) हे एकटेच दुकानात बसून होते. अचानक दोघे दुकानात आले. त्यांनी नावरे यांना सोन्याची साखळी दाखवा म्हटले. नावरे यांनी सोनसाखळीचा ट्रे समोर ठेवताच तिसरा दरोडेखोर दुकानात शिरला. त्याने आतून शटर ओढून घेतले. चवथा एक बाहेरच थांबला. धोका लक्षात आल्याने नावरे यांनी ओरडण्याा प्रयत्न करताच एकाने त्यांचा गळा दाबला. दुसऱ्याने पिस्तुल कानशिलावर ठेवले. नंतर टेपपट्टी त्यांच्या तोंडावर लावली आणि त्यांचे हात बांधले. त्यांनी विरोध केला असता एका दरोडेखोराने त्यांच्या तोंडावर ठोसे मारून त्यांना जबर जखमी केले. त्यांच्या तोंडावर शेंदरी रंगाचा कापड टाकून त्यांना त्यांची बसण्याची खुर्ची आणि काउंटरच्या निमळत्या जागेत कोंबले. त्यांचा मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर दरोडेखोरांनी तिजोरीतील चार ते साडेचार लाखांची रोकड आणि शोकेसमधील ६०० ग्राम सोन्याचे आणि १० किलो चांदीचे दागिने असा सुमारे २० ते २५ लाखांचा ऐवज लुटून नेला. जाताना त्यांनी सीसीटीव्हीचा स्वीच काढून घेतला. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
हा संपूर्ण घटनाक्रम दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरोडेखोर गेल्यानंतर नावरे यांनी स्वताचे हात कसेबसे सोडवून घेतले आणि शटर उघडून ते बाहेर आले. त्यानंतर त्यांनी आजुबाजुच्यांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनाही माहिती कळविली. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली. घटनास्थळी जरीपटक्याचा पोलीस ताफा पोहचला. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त निलोत्पल हे देखिल आपल्या ताफ्यासह पोहचले. नावरे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर तसेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांची विविध पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी कामी लावण्यात आले.
नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिम चौकात असलेल्या अवनी ज्वेलर्समध्ये चार दरोडेखोरांनी शिरून दिवसाढवळ्या चार लाखानची रोकड सात तोळे सोने आणि ७०० ग्राम चांदी लुटून नेली. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. pic.twitter.com/kQCjkvRyvL
दिशाभूल करण्याचे तंत्र दरोडेखोरांनी या गुन्ह्यात पल्सर तसेच पांढऱ्या रंगाची अपाचे अशा दोन दुचाकींचा वापर केला आहे. चार पैकी तिघांनी तोंडावर मास्क लावले होते तर एकाने बुरखा घातला होता. विशेष म्हणजे, दरोडेखोर हिंदीत बोलत होते. एकमेकांचे अफजल आणि तसेच काहीसे नाव घेऊन आपसात संभाषण करत होते. मात्र, त्यांनी आपल्या मनगटावर धागे बांधले होते. त्यांनी दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, आरोपींचा कसून शोध सुरू असून आम्ही लवकरच त्यांच्या मुसक्या बांधू, असा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
Web Title: In day light filmstyle robbery; Jweller's hands were tied around his mouth and he was beaten to death