गोव्यातील ‘डेझरटेड’ पोलीस शिपाई अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:31 PM2019-01-09T20:31:23+5:302019-01-09T20:34:21+5:30
तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा; कोलव्यातून अटक
मडगाव - कामावर गैरहजर राहत असल्याने पोलीस खात्यातर्फे ‘डेझरटेड’ म्हणून घोषीत केलेला तसेच गोव्यातील केपे पोलिसांना चंदनाच्या वृक्ष तोडप्रकरणी हवा असलेला प्रसाद गावकर (39) याच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गावकर हा आज कोलवा येथे सापडला. मागाहून त्याला ताब्यात घेउन रितसर अटक करण्यात आली.
संशयितही मूळ पिर्ळा येथील रहिवाशी आहे.पिर्ळा - केपे येथील एका जमिनीत बेकायदेशीररित्या घुसून चंदनाचे झाड कापल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. 2015 साली ही घटना घडली होती. केपे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली होती. तपासात पोलिसांनी दामू नाईक या संशयिताला अटकही केली होती. चौकशीत त्याने प्रसाद गावकरही या कृत्यात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र चार वर्षे तो पोलिसांना सापडला नव्हता.
भारतीय दंड संहितेच्या 379, 447,201 कलमाखाली प्रसाद गावकरच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आज गुरुवारी त्याला रिमांडासाठी न्यायालयापुढे उभे केले जाईल. केपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रुतानो पिशोद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्ष अरुण अँण्डू पुढील तपास करीत आहेत.