ठेकेदाराला धमकाविल्याप्रकरणी डी गँगच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 03:51 AM2020-06-28T03:51:27+5:302020-06-28T03:51:39+5:30
जुन्या इमारती उतरविण्याचे कंत्राट घेत असलेला एक ठेकेदार गुरुवारी मोटरसायकलीवरून कामाच्या ठिकाणी जात होता
मुंबई : जुन्या इमारती उतरविण्याचे कामे करीत असलेल्या एका ठेकेदाराला मारहाण करून धमकविण्याचा प्रकार दक्षिण मुंबईतील महंमद अली रोडवरील तेली मोहल्ला येथे गुरुवारी घडला. याप्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी डी गँगशी संबंधित दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे.
इम्रान खान ऊर्फ कालिया (वय ३६) व नबील खान (४०, दोघे रा. तेली मोहल्ला, महंमद अली रोड ) अशी त्याची नावे आहेत. कालिया हा डी गँग टोळीतील हनीफ खान ऊर्फ हनीफ कुत्ता याचा मुलगा असून त्याच्यावर मारहाण व खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जुन्या इमारती उतरविण्याचे कंत्राट घेत असलेला एक ठेकेदार गुरुवारी मोटरसायकलीवरून कामाच्या ठिकाणी जात होता. त्यावेळी तेली मोहल्ल्यातील आयेशा टॉवरजवळ कालिया व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवित शिवीगाळ केली. त्याबाबत त्याने विचारणा केली असता त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पाठीत लोखंडी रॉड मारले, त्याला सोडविण्यास येणाऱ्यांना रॉडने मारण्याची धमकी दिली. याबद्दल ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.