मालाड रेल्वे रुळाजवळ सापडला मृतदेहाचा सांगाडा, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:00 PM2018-09-20T20:00:10+5:302018-09-20T20:00:44+5:30
उद्या या मृतदेहाचं शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली. या मृतदेहाची उंची चार ते साडेचार फूट असून अंदाजे वय २५ ते ३० वय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला अाहे. या महिलेचं नाव अद्याप समजलं नसून बोरिवली रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मालाड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची लांबी वाढवण्याचं काम सुरू आहे. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या पुढील झाडं- झुडपं तोडण्याचं काम सुरु अाहे. हे काम सुरू असताना सोमवारी संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास कामगारांना महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला. मात्र, काही कारणात्सव मृतदेह शताब्दी रुग्णालयातून भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात अाला. पण भगवती रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेहाची दखल न घेता जे. जे. रुग्णालयात पाठवण्यास सांगितले. उद्या या मृतदेहाचं शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली. या मृतदेहाची उंची चार ते साडेचार फूट असून अंदाजे वय २५ ते ३० वय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या महिलेचा मृत्यू अंदाजे २ ते ३ महिन्यांपूर्वी झाला असावा. तसेच या सांगाड्यावर निळ्या पांढऱ्या रंगाचे फुलांची नक्षी असलेली तुकडे झालेली ओढणी आणि लाल रंगाचा टॉप आढळून आलं असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली.