प्रियकरासाठी 5 हजार किमी प्रवास केला, दुसरा देश गाठला पण 'त्याने' तिचाच काटा काढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 03:47 PM2022-11-27T15:47:47+5:302022-11-27T15:51:17+5:30
51 वर्षीय ब्लँका अरेलानो बऱ्याच महिन्यांपासून 37 वर्षांच्या जुआन विलाफुएर्टेच्या संपर्कात होत्या.
प्रियकराच्या भेटीसाठी एका 51 वर्षीय महिलेने तब्बल 5 हजार किलोमीटर प्रवास करून दुसरा देश गाठला. मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिच्या प्रियकराने तिचीच हत्या केली. अवयवांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आले आहेत.
मेक्सिकोमध्ये वास्तव्यास असलेल्या 51 वर्षीय ब्लँका अरेलानो बऱ्याच महिन्यांपासून 37 वर्षांच्या जुआन विलाफुएर्टेच्या संपर्कात होत्या. जुआन पेरूचा रहिवासी होता. बरेच महिने दोघे चॅटिंगच्या माध्यमातून संपर्कात होते. अखेर ब्लँकाने जुआनला भेटण्याचा प्लॅन केला. त्यासाठी पाच हजार किमी अंतर कापून जुआनच्या भेटीसाठी हुआचो गाठलं. जुआन आणि ब्लँका यांची भेट हुआचोमध्ये झाली.
सात नोव्हेंबरला ब्लँका यांनी मेक्सिकोमधील त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. मी ठीक असून जुआनच्या प्रेमात पडल्याचं ब्लँका यांनी कुटुंबियांना सांगितलं. भाची कारला अरेलानोशी ब्लँका यांनी शेवटचा संपर्क साधला. यानंतर ब्लँका यांचा मेसेज किंवा कॉल आला नाही. त्यामुळे कारलानं सोशल मीडियावर ब्लँका यांच्या शोधासाठी एक पोस्ट लिहिली. ब्लँका यांचा शोध घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
कारलाने जुआनसोबतच्या संवादाचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. ब्लँका कंटाळली आहे. तिला जे हवं होतं ते मी देऊ शकलो नाही. त्यामुळे तिने परत जाण्याचा निर्णय घेतलाय, असं जुआननं कारलासोबतच्या संवादात म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात घडलेला प्रकार वेगळाच होता. या दरम्यान पेरु पोलिसांना समुद्र किनारी मृतदेहाचे काही तुकडे सापडले. मात्र मृतदेहाची ओळख पटली नाही.
पोलिसांना एका ठिकाणी काही बोटं सापडली. एका बोटात चांदीची अंगठी सापडली. ती ब्लँका यांची होती. यानंतर विविध ठिकाणांहून शिर, हात, धड सापडलं. पोलिसांनी सगळे अवयव एकत्र जोडले आणि ब्लँका यांच्या हत्येचं गूढ उकललं. यानंतर17 नोव्हेंबरला जुआनला अटक झाली. ब्लँका यांची हत्या करून अवयवांची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्या आला. सध्या जुआन तुरुंगात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.