प्रवरा नदीपात्रात आढळला गळा चिरलेला मृतदेह, संगमनेर खुर्द येथील घटना
By शेखर पानसरे | Published: September 16, 2023 12:15 PM2023-09-16T12:15:38+5:302023-09-16T12:16:05+5:30
मारुती आबा डामसे (वय ४१, रा, संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे मयताचे नाव आहे.
संगमनेर : वाट्याने शेती करणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत प्रवरा नदीच्या पात्रात आढळून आला. शुक्रवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली असून ती संगमनेर खुर्द परिसरात घडली. मृत व्यक्तीने महिलेला पळून आणत तिच्यासोबत विवाह केला होता. त्या महिलेसह तिच्या अज्ञात साथीदारांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मारुती आबा डामसे (वय ४१, रा, संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे मयताचे नाव आहे. दीपाली डामसे व तिचे अज्ञात साथीदार नाव, पत्ता माहीत नाही, यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पांडुरंग आबा डामसे (हल्ली रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर, मुळ रा. कोपरे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पांडुरंग डामसे हे संगमनेर खुर्द येथे त्यांचे भाऊ मारुती डामसे, वहिनी दीपाली डामसे व पत्नी लीलाबाई यांच्यासमवेत वाट्याने शेती करून राहत होते. त्यांचे बंधू मारुती डामसे यांचे पहिले लग्न होऊन घटस्फोट झाल्याने तीन वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेला पळून आणले होते, नोटरी करून त्यांनी मंदिरात विवाह केला होता, त्यानंतर ते संगमनेर खुर्द येथे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. त्यांच्यात भांडणे होत असल्याने दीपाली तिच्या माहेरी निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे निघून गेली.
बुधवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास मारुती डामसे यांच्या मोबाइलवर फोन आला, त्यावेळी त्यांनी फोन स्पीकरवर टाकला असता समोरून दीपाली डामसे हिचा आवाज आला. मी म्हसोबा मंदिराजवळ आले आहे, तुम्ही तेथे या असे ती मारुती डामसे यांना म्हणाली. त्यावेळी ते एकटेच तेथे गेले. बराच वेळ होऊन मारुती डामसे घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोनही बंद आला. शोध घेऊनही ते सापडले नाही.
त्यानंतर शुक्रवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास पांडुरंग डामसे आणि त्यांची पत्नी लीलाबाई हे घास कापण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी नदीपात्रात एक माणूस पाण्यावर तरंगताना आढळून आला. खडकावर रक्ताचे डाग होते. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस तेथे आले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो मारुती डामसे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांत गुन्हा नोंद असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे अधिक तपास करीत आहेत.