घटस्फोटासाठी सासरची माणसं १ कोटी मागताहेत! व्हिडीओ रेकॉर्ड करत तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 02:08 PM2021-11-28T14:08:32+5:302021-11-28T14:10:17+5:30
पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणानं जीवन संपवलं
भोपाळ: मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ४० फूट उंचावरून उडी मारून एका तरुणानं आत्महत्या केली आहे. नर्मदा नदीवर असलेल्या पुलावरून उडी घेत तरुणानं आपलं जीवन संपवलं. त्याआधी त्यानं एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. घटस्फोटासाठी पत्नीसोबत सासरची मंडळी एक कोटी रुपये मागत असल्याचा आरोप त्यानं व्हिडीओमध्ये केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी तरुणाची पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींविरोधात छळाचा आरोप केला आहे. जिल्हा मुख्यालयापासून ८० किलोमीटर दूर असलेल्या बडवाह येथील नर्मदा नदीच्या पुलावरून उडी मारून तरुणानं आत्महत्या केली. अजय द्विवेदी असं तरुणाचं नाव आहे. त्याचे वडील डेप्युटी रेंजर आहेत. अजयचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला.
रिवामध्ये वास्तव्यास असलेला अजय द्विवेदी इंदूरहून स्कूटीवरून त्याच्या मित्रासोबत ओमकारेश्वरला जात होता. त्याच दरम्यान त्यानं नर्मदा नदीवर असलेल्या पुलावरून उडी घेतली. तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर अजयचा मृतदेह सापडला.
अजयचा मृतदेह सापडल्याचं समजताच त्याचं नातेवाईक नर्मदा नदीच्या पात्राजवळ पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अजयचे वडील प्रमोद द्विवेदी रिवा जिल्ह्यातील सिरमौरचे डेप्युटी रेंजर आहेत. त्यांनी अजयच्या सासरच्या व्यक्तींच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. सासरचे लोक पैशांची मागणी करत असल्यानंच अजयनं आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
व्हिडीओत नेमकं काय?
अजय द्विवेदीनं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ चित्रित केला. 'प्रार्थना तिवारी माझ्या मृत्यूला जबाबदार आहे. ३ वर्षांपासून माझ्या कुटुंबाविरोधात केस केली आहे. ३ वर्षांपासून केस सुरू आहे. माझ्याकडून १ कोटी रुपये मागितले आहेत. त्यांनी खूप मोठा कट आखला आहे. त्यामुळे कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना कोर्टानं शिक्षा द्यावी,' असं अजयनं आत्महत्येपूर्वी चित्रित केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.