नागपुरात लॉकडाऊनमध्ये युवकावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:29 PM2020-04-02T20:29:09+5:302020-04-02T20:30:43+5:30
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या भाजीबाजारात गुन्हेगारांना भांडण करण्यास रोखणाऱ्या युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना गणेशपेठ येथील नवी शुक्रवारी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या भाजीबाजारात गुन्हेगारांना भांडण करण्यास रोखणाऱ्या युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना गणेशपेठ येथील नवी शुक्रवारी येथे घडली. शैलेश कृष्णाजी उघडे (२७) रा. नवी शुक्रवारी असे जखमीचे नाव आहे.
कॉटन मार्केटमधील नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्तांनी शहरात काही ठिकाणी भाजीबाजार सुरू केले आहेत. याच अंतर्गत गणेशपेठ गाडीखाना मनपा स्कूल येथे भाजीबाजार लावण्यात आला होता. या बाजारातील घटनेचे सूत्रधार बंटी कळंबे आणि जखमी शैलेशचे मित्र वैभव चरडेनेही भाजीचे दुकान लावले होते. बंटीने ‘माझ्याकडे काय पाहतो’ असे म्हणत वैभवशी वाद घातला. शैलेशही तिथेच होता. त्याने बंटीला वाद घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. बंटी, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल आहे. शैलेशने मध्यस्थी केल्याने तो दुखावला गेला. या वादानंतर बंटी आणि वैभव दुकान बंद करून परत गेले. शैलेश वस्तीमध्ये मित्रासोबत बसला. रात्री ११.३० वाजता बंटी त्याचा साथीदार अंकित बोकडे रा. तांडापेठ, अर्पित झाडे रा. सोमवारी क्वॉर्टर, अद्रिया कोठीवाला, छोटा ताजबाग आणि हर्षल मांदळे रा. राम कुलर सोबत तिथे आला. त्याने चाकूने शैलेशवर हल्ला केला. त्याच्या छातीवर व शरीरावर वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. शैलेशला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि दंग्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.
कामठी येथेसुद्धा जुन्या वादातून एका युवकाच्या घरात घुसून हल्ला केला. एकनाथ सयाम ३० मार्च रोजी कामठीतील शिरपूर येथील एका शेतात झोपला होता. रात्री ११ वाजता राहुल उघडेने साथीदारासोबत त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. नवी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.