आखाती देशातील एजंटसोबत व्यवहार, नोकरीचे आमिष देऊन महिलेची केली विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 09:50 AM2023-03-06T09:50:32+5:302023-03-06T09:50:46+5:30
परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून आखाती देशातील एजंटला तीन लाखांना विकून एका महिलेची फसवणूक करण्यात आली.
मीरा रोड : परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून आखाती देशातील एजंटला तीन लाखांना विकून एका महिलेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी एका महिलेसह एका पुरुषाला अटक केली आहे.
काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीतील फिर्यादी महिलेस आखाती भागातील ओमान - मस्कत देशात दरमहा ३० हजार पगारावर घरकामाच्या नोकरीचे प्रलोभन अशरफ मैदू कैवौरा (४६, रा. चैट्टली, ता. चेराळा, कर्नाटक) व नमिता सुनील मालुसरे (४६, रा. हनुमान मंदिराजवळ, घाटकोपर, मुंबई) यांनी दाखवले होते.
ही महिला ओमान - मस्कत देशात कामास गेल्यानंतर तेथील ओमानी एजंटला भेटली. त्यावेळी भारतातील एजंटनी तुला तीन लाख रुपयास विकले असून, आता जे काही काम सांगतील ते करावे लागेल, असे ओमानी एजंटने सांगितल्यावर महिलेस धक्का बसला. भारतात परत जायचे असेल तर दिलेले तीन लाख रुपये परत करावे लागतील, असे एजंटने सांगितले.
अशी
करून घेतली सुटका
- फसगत झालेल्या त्या महिलेने तिच्या ओमान-मस्कत येथील तिचे ओळखीच्या व्यक्तींना घडलेला प्रकार सांगितला.
- ओळखीच्या व्यक्तींनी तिला एक लाख ६५ हजार रुपयांची मदत केली. ती रक्कम तिने ओमानी एजंटला देऊन स्वतःची सुटका करून घेत मायदेशी गाठले.
- भारतात परतल्यावर महिलेने काशीमीरा पोलिस ठाण्यात नमिता व अशरफविरुद्ध फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिस पथकाने तपास करत नमिता व अशरफ याना १ मार्चला अटक केली आहे.