"नीता भाभी आणि मुकेश भैय्या; हा केवळ ट्रेलर, पुढच्यावेळी.…’’ त्या कारमधील पत्रातून दिली अशी धमकी
By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 11:11 AM2021-02-26T11:11:26+5:302021-02-26T11:19:01+5:30
''Dear Nita Bhabhi and Mukesh Bhaiya; It's just a trailer, next time. threaten to Ambani family in The letter : स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमधून एक पत्रही जप्त करण्यात आले असून, या पत्रामधून मुकेश आंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे.
मुंबई - देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर (mukesh ambani house) काल स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमधून एक पत्रही जप्त करण्यात आले असून, या पत्रामधून मुकेश आंबानी (Mukesh Ambain) आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. (''Dear Nita Bhabhi and Mukesh Bhaiya; It's just a trailer, next time. threaten to Ambani family in The letter )
अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या संशयास्पद स्कॉर्पिओमधील पत्रात म्हटले आहे की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आणि त्यातील धमकीचे पत्र कुणी लिहिले होते. याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
मुकेश अंबानी यांच्या अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया निवासस्थानाजवळ काल संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या स्कॉर्पिओमध्ये २० जिलेटीनच्या कांड्या मिळाल्या. अंबानी यांच्या बंगल्यापासून जवळच हे वाहन उभे होते. स्फोट होण्यासाठी जिलेटीनच्या कांड्या एकत्रित जोडलेल्या नव्हत्या. अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.
दरम्यान, आता समोर येत असलेल्या माहितीनुसार या स्कॉर्पिओमध्ये मुंबई इंडियन्सचा लोगो असलेली एक बॅग, तसेच काही नंबर प्लेट्स आढळून आल्या आहेत. तसेच एक धमकीचे पत्रही या स्कॉर्पिओमधून हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये ही स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यावरील नंबर प्लेट खोटी असल्याचे तपासात उघड झाहे आहे. ही स्कॉर्पिओ आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी झाली होती.
रात्री गाडी उभी केली!
बुधवारी रात्री उशिरा तिथे गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत काही स्फोटके होती आणि गाडीत वेगवेगळ्या नंबरप्लेटही पोलिसांना सापडल्या. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीप्रमाणे, तिथे दोन गाड्या आल्या होत्या. दुसऱ्या गाडीबाबत अद्याप माहिती समजलेली नाही.
सीसीटीव्ही ताब्यात
मध्यरात्री एक वाजता कारमायकेल रोड परिसरात ही गाडी पार्क करण्यात आली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाठीमागून आलेल्या दुसऱ्या गाडीत बसली. फ्लॅश लाईट ऑन केल्यामुळे गाड़ीचा क्रमांक सीसीटीव्हीत स्पष्ट दिसला नाही. परिसरातील अन्य सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकड़ून ताब्यात घेण्यात येत आहे.
जिलेटीनच्या कांड्या किती घातक?
खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर होतो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, दगड फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.