युवकाचे मृत्यूप्रकरण : दारव्हा ठाणेदारासह सहा जणांची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:00 PM2021-07-08T21:00:07+5:302021-07-08T21:01:17+5:30

Crime News : पुसद शहरच्या सुरेश मस्के यांना आणले दारव्हात

Death case of a youth: Lifting bangle of six persons including Darwha Thanedar | युवकाचे मृत्यूप्रकरण : दारव्हा ठाणेदारासह सहा जणांची उचलबांगडी

युवकाचे मृत्यूप्रकरण : दारव्हा ठाणेदारासह सहा जणांची उचलबांगडी

googlenewsNext
ठळक मुद्दे याप्रकरणाची गंभीर दखल घेत दारव्हा ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्यासह सहा जणांना कसुरीवरून नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे.

यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाला हादरविणारी घटना दारव्हा येथे घडली. पोलीस ठाण्यात ताब्यात घेतलेल्या युवकाचा मृत्यू झाला. यानंतर जनक्षोभ उसळून ठाण्यावर दगडफेक झाली. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत दारव्हा ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्यासह सहा जणांना कसुरीवरून नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी बुधवारी हा आदेश जारी केला.

दारव्हा ठाणेदार यशवंत बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक सुनील विसपुते, जमादार पुरुषोत्तम बावने, जमादार संजय मोहतुरे, शिपाई सचिन जाधव, चालक शब्बीर पप्पूवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. यातील पुरुषोत्तम बावने, संजय मोहतुरे, सचिन जाधव, शब्बीर पप्पूवाले या चौघांविरूद्ध मारहाणीची तक्रार मृत शेख इरफान यांचा भाऊ शेख जमीर याने दिली आहे. या तक्रारीची चौकशीही केली जात आहे. पोलिसांकडून पुढील कारवाईसाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. शेख इरफान याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवचिकित्सा अहवालातूनच उघड होणार आहे. शरीरावरील पंचनाम्यात वरकर्णी कुठेही गंभीर स्वरूपाची मारहाण असल्याचे आढळले नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र, शरीरात अंतर्गत दुखापत झाल्याने मृत्यू झाला काय, हे शवचिकित्सा अहवालातूनच स्पष्ट होणार आहे. दारव्हा प्रकरणात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर या घटनेच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

या घटनेला जबाबदार धरून दारव्हा ठाणेदारासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वांवरच कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत त्यांना नियंत्रण कक्षात, तर जमादार व शिपायांना पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. दारव्हा ठाण्याची सूत्रे पुसद शहरचे ठाणेदार सुरेश मस्के यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एकंदरच या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन खुद्द पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिले आहे. दगडफेक करणारे कोण, त्यांचाही शोध आता दारव्हा पोलीस घेत आहेत. त्यासाठी व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज याची पडताळणी करून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Death case of a youth: Lifting bangle of six persons including Darwha Thanedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.