सामूहिक बलात्कारातील ‘त्या’ दलित मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 07:01 AM2020-09-30T07:01:53+5:302020-09-30T07:02:27+5:30
उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना; दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी ३ वाजता या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि तुरुंगात असलेल्या चारही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.
कायदा-सुव्यवस्था बिघडली; प्रियांका यांची टीका
काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी मंगळवारी टष्ट्वीट करीत म्हटले आहे की, हाथरसमधील अत्याचार सहन करणाऱ्या त्या दलित मुलीने जीव सोडला. दोन आठवडे ती मृत्यूशी झुंज देत होती. हाथरस, शाहजहांपूर आणि गोरखपूरमध्ये एकानंतरच्या एक अशा घटनांनी राज्य हादरून गेले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. या मुलीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.