रुग्णालयात न जाता पाेलिसांत गेल्याने मृत्यू; गोळीबार प्रकरण : अति रक्तस्राव जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:59 AM2022-07-31T05:59:36+5:302022-07-31T05:59:46+5:30
अंबरनाथ शिवाजीनगर शिवसेना शाखा समोर शुक्रवारी काही हल्लेखोरांनी तुषार गुंजाळ आणि त्याचा भाऊ गणेश गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
- पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : दोन गटातील वादातून झालेल्या गाेळीबारात शुक्रवारी अंबरनाथमध्ये एका तरुणाला मृत्यू झाला. गोळी लागल्यानंतरही या तरुणाने मारेकऱ्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तसेच जखमी अवस्थेत रुग्णालयात जाण्याऐवजी ताे तक्रार करण्यासाठी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेला. त्यामुळे उपचारास विलंब हाेऊन अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अंबरनाथ शिवाजीनगर शिवसेना शाखा समोर शुक्रवारी काही हल्लेखोरांनी तुषार गुंजाळ आणि त्याचा भाऊ गणेश गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोर शंकर शिंदे आणि त्याचा साथीदार थापा ऊर्फ रॉकी हे दोघेही गुंजाळ बंधूंवर हल्ला करताना दिसत आहेत. शिंदे याने तुषारवर झाडलेली गोळी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लागलीच दुसरी गोळी गणेश गुंजाळ याच्यावर चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्टल लॉक झाल्याने गणेश थोडक्यात बचावला. मात्र, रॉकी आणि शिंदे या दोघांनी गणेशला चॉपरने जबर मारहाण केली. या हल्ल्यात गोळी लागून जखमी झालेला तुषार हा शेवटपर्यंत हल्लेखोरांबरोबर प्रतिकार करत होता. हल्लेखोर पळून गेल्यावर तुषारने रुग्णालय न गाठता पोलीस ठाणे गाठून तेथे तक्रारीचा प्रयत्न केला.
वादातून हल्ला
गुंजाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. तसेच गुंजाळ यांचे अंबरनाथमधील संजय पाटील नावाच्या गुंडासोबत एक जुनी इमारत पाडण्याचे काम मिळावे यासाठी पाटील आणि गुंजाळ यांच्या वाद झाला होता.