उपासनगर येथील अपघातात वास्कोतील हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 08:39 PM2019-05-25T20:39:23+5:302019-05-25T20:42:09+5:30
शनिवारी पहाटे ६.२० च्या सुमारास हा अपघात घडला.
वास्को - गोव्यातील वास्को शहरातला नामावंत हॉटेल व्यवसायिक राजेशकुमार हलवाई शनिवारी पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ साठी गेले असता वेर्णा महामार्गावर त्यांना मालवाहू रिक्षाने धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. खारीवाडा, वास्को येथून मासे घेऊन जात असलेल्या रिक्षाने राजेशकुमार यांना धडक दिल्याने ते गंभीररित्या जखमी झाले असून नंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे ६.२० च्या सुमारास हा अपघात घडला. वास्कोत असलेल्या ‘न्यू बनारसी डेरी अॅण्ड रेस्ट्रोरंण्ट’ चे राजेशकुमार मालक असून नेहमीप्रमाणे शनिवारी ते ‘मॉर्निंग वॉक’ साठी आपल्या घरातून निघाले होते. जेव्हा ते उपासनगर येथील महामार्ग रस्त्यावर पोचले तेव्हा त्यांना मासे घेऊन जाणाऱ्या मालवाहू रिक्षा (क्र. जीए ०२ एन ०९४०) ने जबर धडक दिली. यामुळे राजेशकुमार रस्त्यावर फेकले जाऊन यात ते गंभीर रित्या जखमी झाले. ह्या अपघाताची माहीती मिळताच १०८ रुग्णवाहीकेने त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन त्यांना उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत राजेशकुमार हे ५२ वर्षाचे असून ते उपासनगर, वेर्णा भागात राहत असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
अपघाताची माहीती मिळताच पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन ह्या अपघाताचा पंचनामा केला. तसेच अपघातात सामील असलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून खारीवाडा, वास्को येथील रिक्षा चालक सुभाष राथोड (मूळ रा. बागलकोट कर्नाटक) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. पोलीस हवालदार नेवील फर्नांडीस यांनी अपघाताचा पंचनामा केला असून वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर अधिक तपास करीत आहेत.