जुन्या वादातून जबर मारहाणीत महिलेचा मृत्यू, तिघांवर गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: July 23, 2023 05:16 PM2023-07-23T17:16:50+5:302023-07-23T17:18:41+5:30
याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री तिघांवर गुन्हा दाखल झाला.
धुळे : आपापसातील जुना वाद मिटवून घ्या या कारणावरून शीतल अशोक व्यवहारे या महिलेला अवधान एमआयडीसी येथे मारहाण करण्यात आली. २४ जून रोजी सायंकाळी ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला मालेगाव रोडवरील झोडगे गावाजवळ फेकून दिले. उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री तिघांवर गुन्हा दाखल झाला.
मयत महिला शीतल व्यवहारे हिचा चुलत भाऊ गौरव कैलास व्यवहारे (वय ३०, रा. ठाणगाव, ता. सिन्नर जि. नाशिक) यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गौरव यांची बहीण शीतल ही अवधान एमआयडीसी येथील डिम्स हर्बल कंपनीत कमिशन बेसवर काम करत होती. २४ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिला पकडून उचलून कंपनीत नेण्यात आले. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जुना वाद मिटवून घ्या, असे बोलून त्याच वेळेस तिल मारहाण करण्यात आली.
अमानुषपणे तिला मारहाण करण्यात आली. यात तिच्या पोटाला, डोक्याला, पाठीला, कंबरेला, पायाला, डाव्या डोळ्यावर अशा विविध ठिकाणी जबर मारहाण करण्यात आली. यानंतर कुठल्यातरी वाहनात घालून तिला मालेगाव रोडवरील झोडगे शिवारात २५ जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या पूर्वी रस्त्याच्या कडेला फेकून देत त्यांनी पोबारा केला. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना ४ जुलै रोजी पहाटे २ वाजता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी शनिवारी रात्री पावणे दहा वाजता मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार तीन जणांविरोधात भादंवि कलम ३०४, ३६७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. काळे करत आहेत.