विजेच्या धक्क्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू, सहा महिन्यांनी ठेकेदारावर गुन्हा
By योगेश पांडे | Published: March 1, 2024 07:18 PM2024-03-01T19:18:04+5:302024-03-01T19:18:43+5:30
१० ऑगस्ट २०२३ रोजी न्यू मनीषनगर येथील बांधकाम साईटवर पियुष पवन यादव या चार वर्षाच्या मुलाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.
नागपूर : कंस्ट्रक्शन साईटवर वीजेचा धक्का लागून ऑगस्ट महिन्यात एका चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात ठेकेदारावर बेजबाबदारपणाा ठपका ठेवत सहा महिन्यांनंतरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
१० ऑगस्ट २०२३ रोजी न्यू मनीषनगर येथील बांधकाम साईटवर पियुष पवन यादव या चार वर्षाच्या मुलाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्याचे वडील पवन (३०, मंडला, मध्यप्रदेश) यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता पवन यादव हे बारेमोरे यांच्या घराच्या बांधकामाचे काम करत असल्याची बाब समोर आली. तेथील ठेकेदार गोपी याने त्यांना जयहिंद सोसायटीत शेजारीच सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटसमोर झोपडी बांधून राहण्याची व्यवस्था केली होती.
तेथील ठेकेदार योगेश विलायतकर (संत ज्ञानेश्वर सोसायटी, मानकापूर) याने बांधकामाच्या ठिकाणी इलेक्ट्रीकबाबतीत कोणतीही काळजी घेतली नव्हती. अगदी इलेक्ट्रीकच्या वायरदेखील कुरतडलेल्या अवस्थेत होत्या. काही ठिकाणी वायरला चिकटपट्टी लावण्यात आली होती, तर बरेच ठिकाणी वायर उघड्याच होत्या. अशाच एका वायरला स्पर्श झाल्याने पियुषचा जीव गेला होता. पोलिसांनी चौकशीअंती योगेश विलायतकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.