हा कुठला न्याय... भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवणाऱ्या अमेरिकन पोलिसावर खटला नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 01:40 PM2024-02-22T13:40:34+5:302024-02-22T13:40:34+5:30
जान्हवी रस्ता ओलांडताना तिला पोलिसांच्या व्हॅनने उडवले. त्यातच तिचा मृत्यू झाला.
Death of Jaahnavi Kandula in America: भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला हिची काही दिवसांपूर्वी अमेरिकेत हत्या झाली. हा प्रकार खूपच धक्कादायक आणि खळबळजनक होता. जान्हवीसोबत घडलेल्या प्रकारानंतर तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी साऱ्यांचीच भावना आहे. पण या प्रकरणातील आरोपीविरोधात खटलाच चालवला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस व्हॅन जान्हवीच्या अंगावर चढवली होती आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता असे सांगितले जाते. पण अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिएटलमधील त्या पोलीस अधिकाऱ्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही. सिएटलमधील त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव केविन डेव्ह आहे. त्याच्यावर खटला का चालवला जाणार नाही, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
जान्हवी कंदुला नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, सिएटल कॅम्पसमधून पदवीचे शिक्षण घेत होती. जान्हवी कंडुलाचा मृत्यू हृदयद्रावक होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही हे मान्य केले आहे. २३ जानेवारीला ही घटना घडली, जेव्हा २३ वर्षीय जान्हवीला सिएटलमध्ये रस्ता ओलांडताना पोलिसांच्या कारने धडक दिली. सिएटल पोलीस अधिकारी केविन डेव्ह पोलिसांची गाडी चालवत होता. केविन डेव्हला ड्रग्जच्या ओव्हरडोसशी संबंधित फोन घेण्याची घाई होती, असे म्हटले जाते.
पोलीस अधिकारी असलेला डेव्ह ताशी १२० किलोमीटर वेगाने गाडी चालवत होता. या दरम्यान, जान्हवीला भरधाव वेगाने येणाऱ्या पोलिसांच्या गस्तीच्या गाडीने धडक दिली आणि त्यानंतर ती १०० फूट दूर जाऊन पडली. सिएटल पोलिस विभागाचे अधिकारी डॅनियल ऑर्डरर नंतर या घटनेवर फारसे गंभीर दिसले नाहीत. डॅनियलने तपासात कोणताही गुन्हेगारी सहभाग स्पष्टपणे नाकारला. ज्या अधिकाऱ्याने वाहनाला धडक दिली त्या अधिकाऱ्याने हेतुपुरस्सर अपघात केल्याचे तपासात आढळून आले नाही. त्यामुळे पुराव्याअभावी त्याच्यावर खटला चालवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.