भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाचा मारहाणीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:14 PM2020-01-29T14:14:42+5:302020-01-29T14:23:29+5:30
लाकडी दांडक्याने केला डोक्यात प्रहार
विमाननगर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी येथील कळस येथे घडली. भरत काळुराम देवकर (वय ६२) यांचा या भांडणात दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे सुरू होते.
सोमवार (दि.२७) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी कळस येथील सर्व्हे क्र. ४ माळवाडी येथील शिवाजी देवकर व शेजारी राहणाºया राजेंद्र दरेकर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. राजेंद्र यांच्या पत्नी शारदा यांनी देवकर यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यांचे मोठे बंधू भरत देवकर (वय ६२) हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता, शारदा यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने भरत यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत भरत हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ससून रुग्णालयात मंगळवारी सकाळी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर कळस गाव स्मशानभूमीत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याप्रकरणी भरत देवकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांना मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव करीत आहेत.
........
भरत देवकर हे निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, तसेच तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. येरवड्यातील एस. एस. इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव देवकर यांचे ते लहान बंधू होते. कळस गावातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.