मेडिकलच्या अस्थायी कर्मचाऱ्याचा मृत्यू; विष घेतल्याने सुरू होते उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 02:37 PM2020-12-19T14:37:15+5:302020-12-19T14:37:20+5:30
खिशातून सुसाईड नोट बेपत्ता
यवतमाळ : मेडिकल प्रशासन आणि शासनाविरूद्ध रोष व्यक्त करत विषारी औषध घेतलेल्या मेडिकलच्या अस्थायी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान, या कर्मचाऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी बेपत्ता असल्याचे त्यांच्या मुलांनी अस्थायी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
येथील वाघापूर परिसराच्या बनकर ले-आऊटमध्ये वास्तव्याला असलेले देवीदास वडस्कर हे येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सेवेत कायम करावे, या मागणीसाठी लढा देऊनही उपयोग होत नसल्याने त्यांनी नैराश्यातून १८ डिसेंबर रोजी विषारी औषध घेतले. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी बेपत्ता असल्याचे त्यांची मुले मंगेश वडस्कर व हेमंत वडस्कर यांनी कर्मचारी युनियनच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. वाचून मोबाईलने फोटो घेतल्यानंतर चिठ्ठी खिशात टाकून दिली. पोलीस केस असल्याने हा प्रकार केला. मात्र मृत्यूनंतर खिसे तपासले असता त्यात चिठ्ठी मिळाली नाही. या प्रकाराची चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.