वडिलांच्या हत्येची तक्रार करणाऱ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
By प्रशांत माने | Published: November 3, 2023 04:43 PM2023-11-03T16:43:07+5:302023-11-03T16:44:21+5:30
मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
डोंबिवली: वडिलांच्या हत्येची तक्रार देणा-या मुलाला दोघा अनोळखी व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवारी रात्री ११ वाजता पुर्वेकडील कल्याण-शीळ मार्गावर घडला. याप्रकरणी मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
हेदुटणे गावात पाणी टॅंकर व्यावसायिकाकडे काम करणा-या संतोष सरकटे या कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची घटना जानेवारीत घडली होती. दरम्यान मृत्यू हा मारहाणीत झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी सरकटे यांचा मुलगा सागर याने मानपाडा पोलिस ठाणे आणि कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या तपासात सरकटे यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे उघड झाल्याने याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी जुलैमध्ये नितीन पाटील आणि विजय पाटील यांना अटक केली आहे.
दरम्यान सरकटे यांचा मुलगा सागर हा गुरूवारी रात्री ११ च्या सुमारास दुचाकीने कल्याण-शीळ रोडवरून जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी सागरला त्याची दुचाकी बाजुला घ्यायला सांगितली. सागरला शिवीगाळी करीत तू नितीन आणि विजय यांच्याविरूध्द केलेली तक्रार मागे घे, तुला आम्ही परत सांगणार नाही. आज ना उदया ते बाहेर येतील तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारतील अशी धमकी दिल्याचे सागर ने मानपाडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.